esakal | महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्तृत्वानेच पडेल 
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्तृत्वानेच पडेल 

सरकारने पोलिसांकडून तपास काढून सीबीआयकडे देण्याची गरज होती. त्याला काहीच हरकत नव्हती. परंतु राज्य सरकारचे नेमके काय इन्टेशन होते.

महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या कर्तृत्वानेच पडेल 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची अब्रू पुरती चव्हाट्यावर आली आहे. भाजपवर कितीही आरोप होत असले तरी हे भरकटलेले सरकार स्वतःच्या कर्तृत्वानेच पडेल, असे मत माजी मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, की न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडीला मोठी चपराक दिलेली आहे. वास्तविक, राज्य सरकारने ही वेळ येऊ द्यायलाच नको होती. अभिनेता सुंशातसिंह यांच्या घरच्यांनीच जर सीबीआय तपासाची मागणी केली होती तर त्याच वेळेस सरकारने पोलिसांकडून तपास काढून सीबीआयकडे देण्याची गरज होती. त्याला काहीच हरकत नव्हती. परंतु राज्य सरकारचे नेमके काय इन्टेशन होते, हेच कळत नाही. 


बिहार पोलिस ‘क्वारंटाइन’ कशासाठी? 
राज्य सरकारने सीबीआयकडे तपास देण्याऐवजी बिहारहून तपासासाठी आलेल्या पोलिस महासंचालकांसह त्यांच्या टीमला क्वारंटाइन केले. हा प्रकार चुकीचा होता. त्या अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची कोणतीही गरज नव्हती. त्यांना क्वारंटाइन करून सरकारने आपले हसू करून घेतले आहे. 


कर्माचे फळ मिळणार! 
भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी करतात. मात्र, भाजपला राज्य सरकार पाडण्याची कोणतीही गरज नाही. सध्या राज्यातील स्थितीवरून हे सरकार भरकटलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते त्याच्या कर्मानेच पडेल, असेही महाजन म्हणाले. राऊतांचे डोके ठिकाणावर आहे काय? 
राज्य शासनाने सीबीआयकडे तपास दिला तर नाहीच, उलट शिवसेनेचे खासदार संजय राऊत वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. सीबीआय आणि ‘डब्ल्यूएचओ’सारखेच असल्याचे वक्तव्य करताना डॉक्टरांना काय कळतं... मी तर कंपाउंडरकडून औषधे घेतो, अशी मुक्ताफळेही त्यांनी जाहीरपणे उधळली. त्यामुळे खासदार राऊतांचे डोके ठिकाणावर आहे काय, असेच म्हणावे लागेल.  

संपादन- भूषण श्रीखंडे