esakal | आशादायक : आठशेवर कोरोनाग्रस्तांना ‘जनआरोग्य’चे वरदान 
sakal

बोलून बातमी शोधा

आशादायक : आठशेवर कोरोनाग्रस्तांना ‘जनआरोग्य’चे वरदान 

जळगाव जिल्ह्यात जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण ३४ संलग्न रुग्णालये असून, त्याठिकाणी या शस्त्रक्रिया व उपचार होऊ शकतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी आरोग्यमित्र कार्यरत आहेत.​

आशादायक : आठशेवर कोरोनाग्रस्तांना ‘जनआरोग्य’चे वरदान 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव  : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण ३४ अंगीकृत रुग्णालये आहेत. त्या माध्यमातून आठशेपेक्षा अधिक कोविड व संशयित रुग्ण, तर साडेचार हजारांवर नॉनकोविड अशा एकूण साडेपाच हजारांवर रुणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. एप्रिलपासून सुमारे १२ कोटी ४३ लाखांचा लाभ राज्य शासनाने दिला आहे. 

गरीब रुग्णांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने शासनाने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली. १ एप्रिलपासून सुधारित एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात ई- निविदा पद्धतीने निवड केलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिकुटुंब दर वर्षी दीड लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. 

या प्रमुख शस्त्रकिया, उपचार 
योजनेत ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यात सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र, स्त्रीरोग, अस्थिव्यंग, हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लॅस्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी उपचार यांचा लाभ समाविष्ट आहे. 

जिल्ह्यात ३४ रुग्णालयांमध्ये लाभ 
जळगाव जिल्ह्यात जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण ३४ संलग्न रुग्णालये असून, त्याठिकाणी या शस्त्रक्रिया व उपचार होऊ शकतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. योजनेंतर्गत कोविड किंवा संशयित कोविड मंजूर ७२१ प्रकरणांसह इमर्जन्सी टेलिफोनिक इन्टिमेशनद्वारे ११६ अशा एकूण ८३७ प्रकरणांत कोविड किंवा संशयित कोविड रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच चार हजार ८४४ नॉनकोविड रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी शासनाने एकूण १२ कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गोपाल जोशी यांनी दिली. 

‘जनआरोग्य’ लाभ असा 
रुग्णप्रकार---------संख्या------लाभ रक्कम 
कोविड/संशयित----८३७-------एक कोटी ६८ लाख 
नॉनकोविड -------४८४४-----दहा कोटी ७४ लाख 
एकूण रुग्ण--------५६८१------१२ कोटी ४३ लाख 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image
go to top