प्रेमीयुगल चौपाटीवर आले फिरायला; पण त्‍यांच्यावर बेतला वाईट प्रसंग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

मुंबईत वैद्यकीयचे शिक्षण घेत असलेला इंद्रजित मैत्रिणीसोबत मेहरूण तलावाकाठी फिरायला आला होता.

जळगाव : मेहरूण चौपाटीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन प्रेमीयुगलास चक्क चॉपर लावून लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळाल्यावर त्यांनी तक्रारदारास बोलावून गुन्हा नोंदवून घेत मुख्य संशयिताला अटक करण्यात आली. 
मुंबईत वैद्यकीयचे शिक्षण घेत असलेला इंद्रजित मैत्रिणीसोबत मेहरूण तलावाकाठी फिरायला आला होता. तेव्हा राहुल गवळी, शकील शहा व माकोडा या तिघांनी दोघांना घेरून चॅापरचा धाक दाखवत दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता एकाने इंद्रजितच्या पोटाला चाकू लावला. झटापटीत इंद्रजितच्या पोटाला दुखापत झाली. यावेळी मैत्रिणीशीही त्यांची झटापट झाली. त्यानंतर संशयित मैत्रिणीचा २५ हजारांचा मोबाईल हिसकावत दुचाकीने पसार झाले. 

वर्णनावरून शोध
इंद्रजित याने हा प्रकार मित्र धीरज महाजन व रोहित चौधरी यांना सांगितला. त्यांनी तिघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. दोन दिवसांनंतर कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर इंद्रजितने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी संशयितांच्या वर्णनावरून संशयित राहुल गवळी (२०, रा. गवळीवाडा, तांबापुरा), शकिल शहा रुबाब शहा, शोएब कलीमोद्दीन शेख ऊर्फ माकेाडा (दोन्ही रा. तांबापुरा) यांनी ही लुटमारी केल्याचे दिसून आले. 

अन्‌ दिली कबुली
पोलिसांनी संशयित राहुल गवळी यास ताब्यात घेतले. संशयित या परिसरात वाटमारी करणाऱ्या टोळीतील असून, राहुलने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मोबाईल काढून दिला. मात्र त्याचे दोन्ही साथीदार पसार झाले. संशयिताला न्या. पी. ए. श्रीराम यांच्यासमोर हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. ॲड. रंजना पाटील यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले. उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mehrun lake couple ride and robbery three boys