जळगाव मनपात अधिकाऱयांच्या भोंगळ कारभारावर सदस्यांनी ओढले ताशेरे !

भूषण श्रीखंडे
Wednesday, 16 September 2020

प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विकासकामांत अडथळा येत असल्याचा सदस्यांनी आरोप करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जळगाव ः महापालिकेतील विविध कामकाजाचे मक्तेदाराचे प्रस्ताव कायम ठेवणे, दिरंगाई करणे, तसेच स्वच्छता अभियानांतर्गत को-ऑर्डिनेटर यांच्या कामांच्या दिरंगाईच्या प्रस्तावाबाबत आज स्थायी समितीच्या सदस्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढत चांगलेच धारेवर धरले. 

महापालिकेची ऑनलाइन सभा स्थायी समितीच्या सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे उपस्थित होते. सभेत महत्त्वपूर्ण सात विषयांवर सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली. सभागृहात व्यासपीठावरील अधिकारीवर्गासह निवडक विभागप्रमुख उपस्थित होते. सभेत कचरा उचलण्याचा तात्पुरता ठेका दिलेल्या एस. के. कंपनीचा प्रस्ताव तसाच पाच महिन्यांपर्यंत कायम ठेवणे, स्वच्छता अभियानांतर्गत को-ऑर्डिनेटरचे काम करीत असलेले पवन चौधरी यांच्या प्रस्तावास दिरंगाई करणे यांसह इतर प्रस्तावांत प्रशासनाने आततायीपणा केला आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विकासकामांत अडथळा येत असल्याचा सदस्यांनी आरोप करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्थायी समितीच्या सभेतील आठ सदस्य निवृत्त होत असून, प्रशासनाचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. 

संकुलांचा आठवडा सात दिवस करावा 
शहरातील व्यापारी संकुले आठवड्यातील सात दिवस सुरू करण्याबाबतचा विषय शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी सभेत मांडला. या वेळी सभापतींनी यासाठी आवश्यक ते सर्व समर्थन आम्ही देऊ, प्रशासनाने याबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे त्वरित पाठवावा, अशा सूचना आयुक्तांना दिल्या. 

बैठकीबाबत कारवाई का नाही : लढ्ढा 
आमदार गिरीश महाजन यांनी महापालिकेत काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. बैठकीत प्रचंड गर्दी होती. दुसरीकडे दुकानदारांकडून पाचपेक्षा अधिक माणसे दिसल्यास फिजिकल डिस्टन्सिंगच्या नावाखाली महापालिका प्रशासन कारवाई करते. मग या बैठकीत नियम मोडत असताना का कारवाई झाली नाही? एकाला एक व दुसऱ्याला वेगळा न्याय, असा पक्षपात केला जात असल्याचा आरोप शिवसेना सदस्य लढ्ढा यांनी केला. 

खड्ड्यांचा पैसा खड्ड्यातच : लढ्ढा 
‘अमृत’ योजनेच्या नावाआड केवळ लपले जात आहे. शहरात ७० ते ८० टक्के रस्ते अतिशय खराब झाले आहेत. या रस्त्यांवर डागडुजी करूनही उपयोग होत नाही. खड्ड्यांसाठीचा पैसा खड्ड्यातच जात आहे, असा आरोप श्री. लढ्ढा यांनी केला. 

साथरोग पसरल्यास जबाबदार कोण? : दारकुंडे 
शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची वाताहत झाली असून, नागरिकांना चालता येत नाही. पावसाच्या रिपरिपमुळे रस्ते खराब झाले आहेत. चिखलामुळे डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. या वेळी आयुक्तांनी शिवाजीनगर परिसरात धूर फवारणी करण्याबाबत मलेरिया विभागास सूचना दिल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Members dissatisfied with the work of Jalgaon Municipal Corporation Standing Committee meeting officers