मध्यम पावसामुळे पिकांना जीवदान...जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

गेल्या दहा- बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. वातावरणात उष्मा वाढला होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांवर ताण पडत होता.

जळगाव ः गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता. 4) आणि रविवारी (ता. 5) हलक्‍या, तर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, पीकवाढीस मदत होणार आहे. 
दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. रविवारी सायंकाळी रावेर व परिसरात सुमारे अर्धा तास समाधानकारक पाऊस झाला. जामनेर, बोदवड, चाळीसगाव, मुक्‍ताईनगरसह जिल्ह्यात कमी-जास्त स्वरूपात पाऊस झाला. गेल्या दहा- बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. वातावरणात उष्मा वाढला होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांवर ताण पडत होता. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

जामनेरला पाऊस 
जामनेर शहरासह सर्वच ठिकाणी 15-20 दिवसांच्या विश्रांतीनंतर वरुणराजाची कृपा बरसली. यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरीराजाच्या चेहऱ्यावर आनंद जणू ओसंडून वाहत होता. तालुक्‍यातील तळेगाव, पहूर, तोंडापूर, शहापूर, नेरी आदी परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जामनेर शहरात अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस झाला. 

अमळनेर परिसरात पाऊस 
अमळनेर शहर परिसरात अर्धा तास चांगला पाऊस झाला. चोपडा, पारोळा तालुक्‍यातही पाऊस झाल्याने शेतीकामांना आता वेग येणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Moderate rains save crops Waiting for heavy rains in the district