घरपट्टी भरणार तर करदात्‍यांना मिळणार ही सवलत; काय घेतलाय ग्रामपंचायतीने निर्णय

mohadi gram panchayat
mohadi gram panchayat

जळगाव : गाव तसे लहान, पण वेगवेगळ्या उपक्रमांनी एक ओळख निर्माण केली. जिल्ह्यातील पहिले तंटामुक्‍त गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या मोहाडी (ता. जळगाव) ग्रामपंचायतीने आणखी एक पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीची वसुली वाढविण्यासाठी शंभर टक्‍के कर भरणाऱ्या कुटुंबाला मोफत धान्य दळून देण्याचा उपक्रम सुरू केला. यासोबतच गावात सार्वजनिक धोबीघाट सुरू करण्याचे कामदेखील केले आहे. 
कामाच्या गुणवत्तेवर वेगवेगळे उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत अशी ओळख आहे. जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले (कै.) भिलाभाऊ गोटू सोनवणे यांच्यापासून सोनवणे परिवाराकडे ग्रामपंचायतीची धुरा आहे. भिला गोटू सोनवणे हयात असताना त्‍यांनी जिल्ह्यातील पहिले तंटामुक्‍त गाव, अशी ओळख आपल्‍या मोहाडी गावाला मिळवून दिली. यानंतर विकासाच्या दृष्‍टीने त्‍यांनी एकप्रकारे विडाच उचलला. विविध योजना प्रभावीपणे राबवीत आले. सध्या सरपंचपदावर शोभा दिनेश सोनवणे विराजमान झाल्या. त्‍यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमार्फत एक नवा उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून, ‘मॉडेल गाव’ बनविण्यासाठी तत्‍पर आहे. यासाठी त्‍यांचे सासरे जिल्हा परिषद समाजकल्‍याण समितीचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्‍याण समितीच्या माजी सभापती लीलाबाई सोनवणे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. 

वर्षभर दळण मोफत 
करवसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीचा शंभर टक्‍के कर भरणाऱ्यास काहीतरी सवलत देण्याचा उपक्रम राज्‍यातील काही ग्रामपंचायतींनी सुरू केला आहे. त्‍याचअनुषंगाने अभिनव उपक्रम राबविणारी मोहाडीची ग्रामपंचायत जळगाव जिल्ह्यात पहिली ठरली आहे. इतकेच नाही, तर तंटामुक्‍त गाव होण्याचा पहिला बहुमानदेखील मोहाडी ग्रामपंचायतीने मिळविला आहे. आता घरपट्टी, नळपट्टी शंभर टक्‍के भरून देणाऱ्या कुटुंबाला वर्षभर मोफत दळण दळून देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीची स्‍वमालकीची मोठी चक्‍की सुरू करण्यात आली आहे. 

धोबीघाट अन्‌ वाचनालयही 
गावाच्या विकासाच्या दृष्‍टीने गावातील सर्व महिलांना एकाच ठिकाणी कपडे धुण्याची सुविधा करण्याच्या अनुषंगाने गावात मोठा धोबीघाट बांधण्यात आला आहे. यासाठी पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे, तर युवकांसाठी सार्वजनिक वाचनालयाचा प्रारंभ करण्यात आला. या सर्व अभिनव उपक्रमांचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती प्रभाकर सोनवणे, माजी सभापती लिलाबाई सोनवणे, सरपंच शोभा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्‍य व ग्रामस्‍थ यांच्या उपस्‍थितीत झाला. 

ग्रामपंचायतीची वसुली वाढविण्याच्या अनुषंगाने शंभर टक्‍के कर भरणाऱ्या कुटुंबासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्थात, करवसुली करून गावाचा विकास चांगल्‍या प्रकारे साधता येणार आहे. 

- शोभा सोनवणे, सरपंच, मोहाडी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com