अठरा हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार पाच दिवसांत तपासणी 

राजेश सोनवणे
Friday, 20 November 2020

शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या आहेत.

जळगाव : कोरोना विषाणूमुळे मार्चपासून बंद असलेल्‍या शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्‍यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक आहे. यासाठीचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 
राज्यात शिक्षण सत्राच्या सुरवातीपासून आत्तापर्यंत पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण ऑनलाइन सुरू होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्‍याचे चित्र लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर यादरम्यान कोविडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तपासणीचा खर्च परवडणारा नसल्याची तक्रार संघटनेने केली होती. यानंतर सर्व शिक्षकांची तपासणी ही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत केली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यावरच शिक्षकांना शाळेत येता येणार आहे. दरम्यान, शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी आदी उपकरणे आवश्यक असणार आहेत. 

१८ हजार कर्मचाऱ्यांची तपासणी 
जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या १३ हजार ३८६ शिक्षकांसह सुमारे साडेचार हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशा सुमारे अठरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी होणार आहे. जिल्हा रुग्णालय वगळता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये पुढील पाच दिवस ही तपासणी होणार आहे. यासंबंधीचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे. 

शाळांचे निर्जंतुकीकरण 
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यासाठी मुख्याध्यापकांकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही. शाळांची साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यास २२ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. शाळांची स्वच्छता, शिक्षक व शिक्षकेतरांची कोविड तपासणी करणे व इतर साधने उपलब्ध करून देणे यासाठी हा कालावधी कमी असल्‍याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन करून ही माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पाठविली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon monday open school and teacher corona test