esakal | भाजपला ‘लक्ष्य’ करण्यासाठी दोघा ‘एकनाथां’सह ‘गुलाब’ही 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal exclusive

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पक्षाचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत, तर शिवसेना विरोधी असून, त्यांचे केवळ १५ नगरसेवक आहेत. शिवसेना नगरसेवक विरोध करीत असले तरी त्यांना फारशी साथ मिळत नव्हती;

भाजपला ‘लक्ष्य’ करण्यासाठी दोघा ‘एकनाथां’सह ‘गुलाब’ही 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच महापालिकेत विरोधी पक्ष शिवसेनाही आता ‘अॅटॅक’ मोडमध्ये आला आहे. नगरसेवकांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू आहे. आगामी काळात शिवसेना दोन ‘एकनाथ’ आणि एक ‘गुलाब’च्या माध्यमातून विरोधाची जोरदार तिरंदाजी करणार आहे. 
जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पक्षाचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत, तर शिवसेना विरोधी असून, त्यांचे केवळ १५ नगरसेवक आहेत. शिवसेना नगरसेवक विरोध करीत असले तरी त्यांना फारशी साथ मिळत नव्हती; परंतु एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच शिवसेना नगरसेवकांनी थेट मुक्ताईनगरात जाऊन खडसे यांची भेटही घेतली. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे मित्रपक्ष या नात्याने खडसे यांची भेट घेऊन मनपातील समस्यांवर चर्चा केली. तसेच या राज्यातील शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही धाव घेतली आहे. 
 
शिंदेंकडे थेट निधीची मागणी 
महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी मिळत नसल्यामुळे या नगरसेवकांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या प्रभागातील कामासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. याबाबत नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र दिले असून, त्यांनी हे पत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी जळगाव महापालिकेसंदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. 

रस्तेकामात गैरव्यवहार 
महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून रस्ते बांधकामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. याबाबत थेट महापालिकेच्या महासभेत पुराव्यासह त्यांची माहिती शिवसेना नगरसेवक देणार आहेत. प्रत्येक प्रभागासाठी रस्तेकामासाठी २० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय शिवाजीनगर व रिंग रोड रस्त्याच्या कामासाठी वेगळा निधी देण्यात येणार आहे. मात्र, केवळ खडी आणि मुरमाचे निकृष्ट दर्जाचे रस्ते करून मोठा गैरव्यवहार सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला असून, तब्बल चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार या कामात झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 
 
मनपात जोरदार संघर्ष 
एकनाथ खडसे यांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशामुळे सत्ताधारी भाजप महापालिकेत ‘ॲक्शन’ मोडमध्ये आले आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून तर खासदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेत नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या बैठकीचा धडाका सुरू केला आहे, तर आता शिवसेनाही ‘अॅटॅक’मध्ये येत असल्याने महापालिकेच्या महासभेत आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार संघर्ष होणार असल्याचे दिसत आहे. 

आमच्या नगरसेवकांच्या प्रभागाची कामेच होत नाहीत. त्यामुळे आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निधी मागणीचे तसेच महापालिकेत लक्ष घालण्याचे पत्र दिले आहे. याशिवाय महापालिकेत रस्तेकामात तब्बल चार कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याबाबतही कारवाईची मागणी करणार आहोत. 
-सुनील महाजन, विरोधी पक्षनेता, महापालिका, जळगाव 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image