अरेच्चा... जिल्हाधिकारी पोहचले नागरीकाच्या दारी, ते का ? वाचा सविस्तर ! ​

देविदास वाणी
Saturday, 11 July 2020

जळगाव शहरातील दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिका व जिल्हा प्रशासनाने शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांना आवाहन करून ‘रुग्णशोध मोहीम’ हाती घेतली आहे.

जळगाव  ः शहरातील महापालिकेतर्फे लॉकडाऊनच्या काळात ‘रुग्णशोध मोहीम’ हाती घेतली आहे. या मोहीमेत नेमके काय तपासले जाते, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबतची पाहणी करण्यासाठी आज सकाळी चक्क जिल्हाधिकारी अभिजित राऊत नागरिकांच्या दारी पोचले होते. आपल्या दारी चक्क कलेक्टर आल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. स्वतःहून कुटुंबीयांची माहिती सर्वेक्षण पथकाला दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी मागील महिन्यात पदभार हाती घेतला. युवा जिल्हाधिकारी असल्याने थेट रस्त्यावर उतरून ते कामाला लागले आहे. सुरुवातीस काही दिवसातच त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयात चक्क रात्री, मध्यरात्री पाच वेळा भेट देऊन, कारभाराची पाहणी केली. जनता ‘लॉकडाऊन’ काळात रस्त्यावरून उतरून नागरिकांना हटकले, पोलिसांना विचारणा केली. आता महापालिकेच्या सर्वेक्षण मोहिमेत महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक काय तपासणी करतात ? त्यांना नागरिक प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी आज सकाळी गिरणा टाकी परिसरातील नवीन पोस्टल कॉलनी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सर्वेक्षण पथकासोबत जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. 

जळगाव शहरातील दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिका व जिल्हा प्रशासनाने शहरातील काही सामाजिक संस्था व संघटनांना आवाहन करून ‘रुग्णशोध मोहीम’ हाती घेतली आहे. यात संपूर्ण शहरातील प्रभाग निहाय विविध संस्थांची योजना केली आहे. यानुसार त्या त्या प्रभागात अन्य संस्थांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील या मोहिमेत प्रशासना सोबत सर्वेक्षण करीत आहेत. 

प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन तपासणी केल्यावर आपण आपल्या परीने मानवी संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद होतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी सांगितले. राजेश ज्ञाने,हितेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुश्रुत मुळे, योगेश चौधरी, दीपक वाणी, क्षितिज गर्गे, राजेश नाईक आदी १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सेवा देत आहेत. 

याबाबींची होते तपासणी... 
रुग्णशोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग)याची नोंद केली जात आहे. 

दररोज १०० घरांचे सर्वेक्षण 
एका टीम मध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १०० व राष्ट्रीय स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीम रोज १०० घरांचे सर्वेक्षण करणार आहे. 
स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation corona patient research campaign status survey