‘मनपा’ची खड्डे बुजविण्याची गजब तऱ्हा ! डांबरी रस्त्याला मुरूमाचा लावला ठिगळ   

सचिन जोशी
Friday, 18 September 2020

सध्या शहरातील सर्वाधिक वाईट व खडतर वाट म्हणून कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंतचा रस्ता कुख्यात झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण न काढता दुभाजक टाकण्यात आले.

जळगाव : शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागल्याचे विदारक चित्र आहे. ते बदलण्यासाठी महापौरांनी गेल्या महिन्यात कठोर सूचना दिल्यानंतरही रस्त्यांतील खड्डे बुजविण्याची अजब महापालिकेची गजब तऱ्हा पाहून आश्‍चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी खड्डे बुजविण्याची छायाचित्रेय ‘व्हायरल’ करून त्याला वाचा फोडली आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून, विशेषत: अमृत योजनेचे काम सुरू झाल्यापासून शहरातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. अमृत योजनेचे काम ज्या ठिकाणी नाही, असे रस्तेही सुस्थितीत नाहीत. प्रमुख रस्त्यांसह उपरस्ते, नागरी वस्त्या, वाढीव वसाहतींमधील रस्त्यांना रस्ते म्हणावे की खड्डे, अशी स्थिती आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेवरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी बैठक घेऊन रस्तादुरुस्तीबाबत तातडीने सूचना दिल्या. 

वरवरची दुरुस्ती 
रस्तेदुरुस्तीचे आदेश देऊन दोन-तीन आठवडे झाले. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये वेस्ट मटेरिअल, मुरूम टाकण्यात आला. त्यातून धुळीचे लोट पसरून नागरिकांचा त्रास आणखीच वाढला. आता पुन्हा खड्डे बुजविण्याची अजब तऱ्हा समोर आली आहे. 

सर्वाधिक वाईट रस्ता 
सध्या शहरातील सर्वाधिक वाईट व खडतर वाट म्हणून कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंतचा रस्ता कुख्यात झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण न काढता दुभाजक टाकण्यात आले. केवळ मर्जीतल्या मक्तेदाराला खूश करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले. त्यातून रस्त्याची होती नव्हती ती वाट लागली. या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली. मात्र, खड्ड्यांमध्ये वरवर मुरूम टाकण्यात येत आहे. हा मुरूम टाकल्याबरोबर वाहन गेल्यानंतर लगेच बाहेर येत आहे. त्यातून धुळीचे प्रदूषणही वाढत असून, नागरिकांना अधिकच्या त्रासातून जावे लागत आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराबद्दल अभिषेक पाटील यांनी टीका करीत या रस्त्याची छायाचित्रेय ‘व्हायरल’ केली आहेत. 

शहराची अवस्था ग्रामपंचायतीपेक्षाही वाईट झाली आहे. रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना खड्डे बुजविण्याची पद्धत अशा प्रकारे ‘शास्त्रोक्त’ असेल तर जळगावकरांनी कपाळावर दगड मारून घ्यावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
- अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation's wonderful work of filling the potholes in the asphalt road with soil