कोरोना पॉझिटिव्ह... आणि कोवीड सेंटर मधून पळून दोघी दारू पिण्यासाठी गावात गेले ! 

भूषण श्रीखंडे
मंगळवार, 14 जुलै 2020

रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने सुरक्षारक्षक सुरक्षित अंतर ठेवून असतांना देखील एक रुग्ण त्यांना धक्का मारत बाहेर पडला.

जळगाव ः शहरातील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दारू पिऊन गोंधळ घातला. महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत दोन्ही मद्यपी रुग्णांची चांगलीच खरडपट्टी काढली. महापौरांनी दोघांना बाहेर बोलावून त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या तसेच त्यांनी बाहेर लावलेल्या रिक्षात देखील दोन दारूच्या बाटल्या मिळून आल्या. मनपाचे डॉक्टर, सहकारी आणि सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केल्याने दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. दोन्ही मद्यपी सुरक्षारक्षकांना जुमानत नसल्याने महापौरांनी स्वतः पुढाकार घेत दोघांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

जळगाव शहर मनपाकडून कोरोना पॉझिटिव्ह आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष स्थापित केला आहे. प्रत्येक रुग्णाला योग्य सुविधा मिळावी यासाठी महापौर भारती सोनवणे, मनपा सदस्य आणि मनपा प्रशासन प्रयत्नशील आहे. महापौर वेळोवेळी इतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह जाऊन त्याठिकाणी पाहणी करीत असतात. गेल्या आठ दिवसापासून महापौर सर्वपक्षीय नगरसेवकांसह रोज सकाळी ३ तास त्याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी बसत आहेत.

स्वःताची रिक्षा घेवून ते गावात गेले…
मनपाच्या कोविड केअर सेंटर ४ मध्ये उपचारार्थ दाखल झालेल्य दोघा रुग्णांनी दारूसाठी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करून रात्री स्वःताची रिक्षा घेवून गावातून मद्य सेवन आले होते. सोबत आणलेल्या दारु सकाळी त्यांनी मद्य सेवन केल्यानंतर एक रुग्ण मद्यधुंद अवस्थेत खाली आला आणि त्याने सुरक्षारक्षकांशी वाद घातला. रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने सुरक्षारक्षक सुरक्षित अंतर ठेवून असतांना देखील एक रुग्ण त्यांना धक्का मारत बाहेर पडला. सुरक्षारक्षक त्याला ओरडत असताना देखील तो बाहेरून दारूच्या बाटल्या घेऊन आल्याने त्यांनी त्याला बाहेरच अडविले. तरीही तो त्यांना न जुमानता पुन्हा खोलीत गेला.

महापौरांनी घेतली धाव 
कोविड केअर सेंटरमधून याबाबत एका रुग्णाने महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता महापौर तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे व अनंत जोशी देखील त्यांच्यासोबत होते. महापौरांनी सर्व प्रकारची माहिती घेत दोन्ही मद्यपी रुग्णांना खाली बोलाविले. यावेळी रात्रीच्या सुमारास एक मद्यपी महिलांच्या खोलीत देखील शिरला असल्याची माहिती समोर आली.

सामानाच्या झाडझडतीत सापडल्या दारूच्या बाटल्या 
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दोघांची चांगलीच खरडपट्टी काढत त्यांच्या सामानाची झाडाझडती घेण्यास सांगितले. एका पिशवीमध्ये दारूच्या दोन बाटल्या मिळून आल्या. महापौरांनी त्यांनी बाहेर लावलेल्या रिक्षात तपासणी करायला लावली असता त्यात आणखी दोन दारूच्या बाटल्या मिळून आल्या. महापौरांनी याबाबत त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सर्व व्हिडीओ चित्रीकरण पुरावा म्हणून जपून ठेवण्यास सांगितले. दरम्यान, मनपाचे डॉक्टर, सहकारी आणि सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केल्याने दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.

नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी : महापौर
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा पुरविण्याचा आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही याची मनपा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. वेळोवेळी याबाबत आयुक्तांना देखील पत्र देण्यात आले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांसह जाऊन पाहणी करीत रुग्णांकडून देखील आम्ही माहिती घेत असतो. काही दिवसांपूर्वी विलगीकरण कक्षात तंबाखूजन्य पदार्थ सापडले होते. मनपा प्रशासन कोरोनामुक्त जळगाव शहर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु नागरिकांकडून जबाबदारीचे पालन केले जात नाही. 

..तर गुन्हा दाखल करणार
आज झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून तरीही नागरिकांचे काही नातेवाईकच त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी सहकार्य करीत आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांची यापुढे अचानक तपासणी करण्यात येणार असून कोणाकडेही अमली पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आज गोंधळ घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली आहे. 

रुग्णांनी रुग्णासारखे राहावे : अनंत जोशी
कोरोनाविरुद्ध अनेक कोरोना योद्धा रात्रंदिवस सेवा देत आहे. जळगावकरांनी देखील थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. याठिकाणी रुग्णांनी रुग्णांसारखेच राहावे अशी विनंती आहे. कोविड केअर सेंटरचे मुख्य प्रवेशद्वार खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात यावे अशी विनंती आयुक्तांना करणार असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी सांगितले.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे
मनपाच्या कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षात शेकडो नागरिक दाखल आहेत. मनपाचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी सर्वांनी वैद्यकीय सेवा, खानपानच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. ते तुमच्यासाठी कर्तव्य बजावीत असले तरी प्रत्येक खोलीत जाऊन लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. त्यातच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दबाव आणण्याचा तसेच दमबाजी करण्याचे प्रकार घडत असतात. मनपा प्रशासन कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करीत नाही. रुगांनी देखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन प्रत्येकाने करावे, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal covid center Two corona-positive patients were On the run by drink alcohol