आदीशक्तीचे उत्साहात आगमन; भाविकांनी मंदिरा बाहेरूनच घेतले दर्शन !

देविदास वाणी
Saturday, 17 October 2020

मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. रंगरंगोटी करण्यात आली आहे. 
आजची पहिली माळ असल्याने भावीकांनी दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरात गर्दी केली मात्र मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागले. 

 जळगाव ः ‘उदे गं..अंबे उदे...’, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आई साहेब….बोला अंबा माता की जय...अंबा माता की जय...अंबा माता की जय...च्या जयघोषात आज जिल्ह्यात घटस्थापना करण्यात आली. एक हजारांवर दुर्गादेवी मंडळांनी देवीच्या मुर्तीची विधीवत स्थापना केली. यंदा कोरोना संसर्गामुळे विना मिरवणूक, विना सनई चौघडे, विना ढोल ताशे देवीची स्थापना झाली. मात्र भक्तांचा उत्साह कोरोना स्थितीतही कायम होता. 

कोरोना संसर्ग हेावू नये यासाठी सर्वच मंदिर बंद असल्याने देवीची मंदिरे बंद होती. मात्र आतील पुजा अर्चावेळेवर झाली. भाविकांना कुलूप बंद अवस्थेत देवीच्या मुर्तीचे दशर्न घ्यावे लागले. नवरात्रोत्सवात नउ देवीची भक्ती करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून चालत आली आहे. नवरात्रोत्सवात भक्ती करून शक्ती मिळवायची व ती वर्षभर वापरायची. देवीला विविध प्रकारचा नवस करून तो पूर्ण झाला की लागलीच नवमीला किंवा दशमीला तो फेडायचा, अशीही श्रद्धा भावीकांची आहे. 

नवरात्रोत्वानिमित्त शहरातील सुभाष चौकात असलेले भवानी मातेचे मंदिर, राष्ट्रीय महामार्गावरील इच्छादेवीचे मंदिर, जूना खेडी रोडवरील कालिंका मातेचे मंदिर, जूना मेहरूण मधील संतोषी माता मंदिरासह विविध ठिकाणच्या देवी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. रंगरंगोटी करण्यात आली आहे. 
आजची पहिली माळ असल्याने भावीकांनी दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरात गर्दी केली मात्र मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागले. 

बाजारपेठत गर्दी 
बहुतांश हिंदू बांधवांच्या घरी घटस्थापना केली जाते. यासाठी लागणारे घट, झेंडूची फुले, विड्याची पाने, केळीचे खोडे, पुजेचे साहित्य खरेदीसाठी भावीकांनी आज बाजारपेठेत गर्दी केली होती. देवीला नवस म्हणून वाढविण्यासाठी नारळ, ओटी, खणालाही मागणी होती. झेंडूचा दर ४० ते ७० रूपये किलो असा होता. सोबतच इतर फुलांसह फळांना मागणी होती. स्थापनेसाठी देवीच्या मुर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक नसावी असे बंधन असल्याने मुर्ती लहानच होत्या. पाचशे रुपयांपासून ते ४ हजारांपर्यंत त्याचा दर होता. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Navratri festivities begin with a shopping spree at the market