esakal | मृत्यूचे भय होते उशाशी..३५ दिवस कोरोनाशी झुंज

बोलून बातमी शोधा

corona fight
मृत्यूचे भय होते उशाशी..३५ दिवस कोरोनाशी झुंज
sakal_logo
By
प्रवीण पाटील

सावदा (जळगाव) : देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक जण बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला कोरोना झाला तर कसे होईल? अशी समाजात कोरोनाची भीती ही आहेच. पण कोरोना झाल्यानंतर योग्य उपचार मिळाल्याने बरे होण्याचे प्रमाण ही खूप मोठे आहे. कोचूर (ता. रावेर) येथील हिरामण चौधरी (वय ५०) यांनी चक्क ३५ दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेऊन झुंज देऊन त्याला हरवून ते बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना झालाच तर घाबरून जाऊ नका तर त्याला धीराने सामोरे जा व उपचार घ्या तो बरा होतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढत असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे नागरिक कोरोनाची तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. पण उशीर झाल्याने मग थेट परिणाम ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि ‘रेमडेसिव्हिर’पर्यंत विषय जाऊन पोहोचतो. अशा परिस्थितीत एक सकारात्मक बाब समोर आली आहे. कोचूर येथील हिरामण चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात तब्बल ३५ दिवस उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.

अन्‌ सुरू झाला जीवन- मरणाचा संघर्ष

सुरुवातीला हिरामण चौधरी यांना ताप आला. सर्दी, खोकला हा सोबत होताच. सर्वांप्रमाणेच त्यांनी देखील अंगावर काढत गावातीलच डॉक्टरांकडे जाणे पसंत केले. गावातील डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतला. रक्त, लघवी तपासणी केली. त्यात टायफाइड व थोडी साखर वाढलेली निघाली, पण आरोग्यात कोणतीही सुधारणा जाणवत नव्हती. यातच त्यांचे दहा दिवस निघून गेले. गावातील डॉक्टरांनी त्यांना सावदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. खासगी हॉस्पिटलमध्ये निमोनिया झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे जा असा सल्ला दिला. आणि पुढे सुरू झाला चौधरी यांचा जीवन मरणाचा संघर्ष. पण या संघर्षात कोरोनाला हरवून हिरामण चौधरी यांनी यशस्वीरीत्या बाजी मारली आहे. त्यानंतर देखील दोन महिने घरी पलंगावर झोपून प्राणवायू लावून औषध उपचार घेतले.

जिल्हा रुग्णालयात घराप्रमाणे सेवा

एरवी अनेक गैरसोयी, अनुचित प्रकार व रुग्णाची हेळसांडच्या घटनांमुळे सामान्य रुग्णालय तसे बदनामच झाले आहे. पण चौधरी यांना आलेला अनुभव हा खूपच सुखद असा आहे. ते २४ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होते. सुरुवातीला दोन, चार दिवस प्राणवायू व नंतर मात्र व्हेंटिलिटर, सोबतच पावरफुल उपचार या काळात जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने डॉक्टर, नर्स वार्डबॉयनेही नितांत प्रेम केले. वेळेवर चहा, नाश्ता, जेवण, औषध हे संपूर्ण घरच्या प्रमाणे वागणूक दिली. या निमित्ताने सामान्य रुग्णालयाचे एक चांगले रूपही समोर आले आहे. त्यासोबत परमेश्वराच्या नामस्मणामुळे मिळाला धीर मिळाल्याने श्री. चौधरी यांनी सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे