esakal | लॉकडाउनचा फटका..केळीचे सहा दिवसांत पाचशेने भाव कमी

बोलून बातमी शोधा

banana packing
लॉकडाउनचा फटका..केळीचे सहा दिवसांत पाचशेने भाव कमी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

सावदा (जळगाव) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ सर्वच उद्योग, व्यवसायांना बसू लागली आहे. संपूर्ण देश आता लॉकडाउन ०.२ च्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचा फटका गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही केळी उत्पादकांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रती क्विंटल १४०० रुपये भावाने विकली जाणारी केळी गेल्या सहा दिवसांतच ८५० ते ९०० भावाने खरेदी केली जात आहे. अर्थात प्रती क्विंटल पाचशे रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

देशांतर्गत आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक राज्यातील व महाराष्ट्रातील नांदेड, सोलापूर या भागातील केळी अपेक्षेपेक्षा लवकर संपली आहे. त्यामुळेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील व मध्यप्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर या जिल्ह्यांमध्ये मार्च ते ऑगस्ट महिन्यात गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम केळी मोठ्या प्रमाणात असते. पवित्र रमजान महिना व चैत्र नवरात्रोत्स यामुळेच देशासह संपूर्ण आखाती देशाचे लक्ष खानदेशी केळीवर होते. त्यामुळे खानदेशी केळी भाव खात होती. पण, मागील पाच, सहा दिवसांत परप्रांतातील व्यापाऱ्यांनी लॉकडाउनचे कारण दाखवून हा भाव प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी कमी केला आहे. केळीचे फळ नाशवंत असताना सरकारने या नाशवंत फळाला राजमान्यता देण्यापासून ते केळी भावावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यासमोर शरणागती पत्करून मिळेल त्या भावात केळीची कापणी करावी लागत आहे.

व्यापाऱ्यांवर अंकुश नाहीच

रावेर बाजार समितीचे वर्तमान केळी बाजारभाव १४०० रुपये प्रति क्विंटल आहेत. केळी व्यापाऱ्यांकडून ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल मागणी आहे. बाजार समितीकडे एखाद्या शेतकऱ्याने व्यापाऱ्यांची तक्रार केल्यास फक्त परवाना रद्द केला जातो. या व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही बाजार समिती करत नाही. कोणत्याही व्यापाऱ्याकडून बाजार समिती बाजारभावाने केळी खरेदी होताना दिसत नाही. याचा अर्थ केळी भाव व खरेदीवर बाजार समितीचा कोणताही अंकुश दिसत नाही.

आम्ही दिल्लीत रोज ५०० क्विंटल केळी विक्री करत होतो. पण सध्या दिल्लीत लॉकडाउन असल्याने शंभर क्विंटल केळीही विकली जात नाही. हातगाडी लावणाऱ्या किरकोळ विक्रीच्या व्यापाऱ्यांनी हातगाड्या लावल्या तर प्रशासन विरोध करीत आहे. आमच्या केळीला उठाव नसल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात केळीचे भाव पडले आहेत.

- आर. के. ताराचंद, केळी व्यापारी, दिल्ली

परप्रांतात लॉकडाउन लागल्याने त्याचा फटका केळी उत्पादकांना बसत आहे. असे सांगून काही व्यापारी लॉकडाउनचा फायदा घेत आहे. माहिती घेऊनच केळी विक्री करावी. व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार असल्यास लेखी स्वरुपात करावी. कार्यवाही करण्यात येईल.

- श्रीकांत महाजन, सभापती, बाजार समिती, रावेर.

उत्तर भारतात केळीला मोठी मागणी असतानाही केळी व्यापारी लॉकडाउनचे भूत दाखवित कमी भावाने केळी कापणी करीत आहेत. पाच, सहा दिवसांमध्ये केळी भावात पाचशे ते सहाशे रुपये भाव कमी देऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. याला रावेर बाजार समितीने पायबंद घालावा.

- कमलाकर पाटील, केळी उत्पादक शेतकरी