esakal | चाचण्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल संभ्रम; ॲन्टिजेन पॉझिटिव्ह, तर ‘आरटीसीपीआर’ नकोच!
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

चाचण्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल संभ्रम; ॲन्टिजेन पॉझिटिव्ह, तर ‘आरटीसीपीआर’ नकोच!

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जळगाव जिल्ह्यात त्यासंबंधी चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, कोरोनाची चाचणी करण्याच्या पद्धतीबद्दल दोन मतप्रवाह असून, चाचण्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल संभ्रम कायम आहे. असे असले तरी, तज्ज्ञांच्या मते रुग्णाची ॲन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर तो १०० टक्के बाधित असतो. त्यामुळे त्याने पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची गरज नाही.

वर्षभरापासून कोरोनाने जगभरात व पर्यायाने भारतातही थैमान घातले आहे. या नव्या संकटात अनेक नवीन घटकांची ओळख झाली, आरोग्यविषयक संकल्पनाही माहीत झाल्या. कोरोनासंबंधी चाचणी करण्याचे दोन प्रकार समोर आले. सुरवातीच्या टप्प्यात केवळ ‘आरटीपीसीआर’ चाचणीच केली जात होती. मात्र, या चाचणीचा परिणाम प्राप्त होण्यास उशीर लागत होता. जसे रुग्ण वाढू लागले, तसे संशोधन होऊन पुढे जाऊन तातडीने अहवाल मिळावा म्हणून रॅपिड ॲन्जेटिन टेस्ट पद्धतही समोर आली.

असा आहे फरक

आरटीपीसीआर चाचणीत संशयित रुग्णाच्या नाक व घशातील स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. एक नमुना तपासणीसाठी साधारण दोन तास लागतात. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे झटपट परिणाम दिसेल, अशा रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचा उगम झाला. एका स्ट्रीपवर केवळ नाकातील स्वॅबचा नमुना टाकल्यानंतर या चाचणीचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांत मिळणे शक्य होते.

चाचण्यांबद्दल संशय

एप्रिल २०२० पासून आरटीपीसीआर व नंतर जूनपासून ॲन्टिजेन चाचण्या सुरु झाल्या. त्याला वर्ष उलटले तरी अद्यापही या चाचण्यांबद्दल संशय व्यक्त होतो. कारण चाचण्यांबाबत काही रुग्णांचे अनुभव व वेगवेगळे असल्याने त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे.

ॲन्टिजेनबद्दल शंका अधिक

रॅपिड ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांतच कळतो. मात्र, या चाचणीबद्दल जास्त शंका घेतली जाते. या चाचणीचा अहवाल काहीही आला तरी रुग्ण आरटीपीसीआर चाचणीचा आग्रह धरतात.

.. तर रुग्ण पॉझिटिव्ह

प्रत्यक्षात ॲन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटीपीसीआर करण्याची गरजच नसते, तो संशयित रुग्ण १०० टक्के बाधित असतो. मात्र, ॲन्टिजेन निगेटिव्ह आली आणि लक्षणे असतील, तर तीन-चार दिवसांनी पुन्हा ॲन्टिजेन चाचणी करावी, अथवा आरटीपीसीआर चाचणी करावी.

‘आरटीपीसीआर’चा आग्रह

सध्याच्या स्थितीत काही रुग्ण ॲन्टिजेन चाचणीवर विश्‍वास न ठेवता आरटीपीसीआर चाचणीचा आग्रह धरतात. एकदा ॲन्टिजेन पॉझिटिव्ह आली, तर आरटीपीसीआर टेस्टही पॉझिटिव्ह येतेच. त्यामुळे कोणत्या स्थितीत आरटसीपीसीआर चाचणी करावी, याबद्दल रुग्णांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

‘फॉल्स’ परिणाम शक्य

ॲन्टिजेन अथवा आरटीपीसीआर चाचणीच नव्हे, तर रक्त व तत्सम स्वरूपाच्या आरोग्यविषयक चाचण्यांमध्ये फॉल्स निगेटिव्ह व फॉल्स पॉझिटिव्ह असे परिणाम समोर येणे शक्य आहे. या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांत हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांपर्यंत असू शकते. म्हणून दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यात आणि तरीही लक्षणे असतील, तर कोविड प्रोफाईलची ब्लड टेस्ट अथवा ‘एचआर सीटी’ स्कॅन करून घेतली पाहिजे.

ॲन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटीपीसीआर करण्याची गरज नाही. मात्र ॲन्टिजेन निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतील, तर आरटीपीसीआर चाचणी करून घेणे उचित ठरते.

- डॉ. राहुल मयूर (निपुण लॅबोरेटरी)

loading image