esakal | कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ‘एमआयडीसी’त स्मशानभूमी

बोलून बातमी शोधा

corona death body
कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ‘एमआयडीसी’त स्मशानभूमी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नेरी नाक्याजवळील स्मशानभूमी अंत्यविधीसाठी तोकडी पडत आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारीत असलेले ‘सेक्टर-के’मधील ओपन स्पेस-१० (८१७२८) पैकी एक हजार ५०० चौरसमीटर क्षेत्र आगामी सहा महिन्यांसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. ती जागा महापालिकेला देऊन महापालिकेने तेथे लवकरात लवकर अंत्यविधीसाठी ओटे, गॅस दाहिनी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.

महापालिका आयुक्तांनी अंत्यविधीसाठी त्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ती जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करावेत. शक्‍य झाल्यास गॅस दाहिनी तयार करण्यात यावी. स्मशानभूमीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था करावी. जैव कचरा व्यवस्थापन करणे, अग्निरोधक सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्‍ती

स्मशानभूमीच्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाची नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीकरिता लागणारे लाकूड (सरण) पुरविण्यासाठी संबंधित पुरवठादारास निर्देश द्यावेत. अंत्यविधीकरिता पुरेसे लाकूड (सरण) उपलब्ध करून द्यावे. लाकूड (सरण) ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची शेड उभारण्यात यावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलींचे पालन करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.