esakal | जळगावात मोठी कारवाई..रेमडेसीवीरच्या काळ्या बाजारात डॉक्टर, लॅब असिस्टंटही

बोलून बातमी शोधा

remdesivir black market
जळगावात मोठी कारवाई..रेमडेसीवीरच्या काळ्या बाजारात डॉक्टर, लॅब असिस्टंटही
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शासकीय अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये मिळत नसलेले रेमडेसीव्हिर इंजेक्शन २६ ते ३३ हजार रुपयांत विक्री करत काळा बाजार करणाऱ्या टोळीचा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भुसावळात एक व जळगावला दोन अशा तीन प्रकरणांत डॉक्टर, लॅब असिस्टंटसह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

रेमडेसीव्हिरसह तत्सम इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा निर्माण झाला असून अनेकांकडून हे इंजेक्शनसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूट सुरु असल्याचे प्रकार रोज समोर येत आहेत.

गुप्त माहितीवरुन छडा

शहरातील काळ्या बाजारात चढ्या दराने या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती कुमार चिंथा यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मागदर्शनान्वये दोन पथके नियुक्त केलीत.

यांना घेतले ताब्यात

गुरूवारी सकाळी ११ वाजता चिंथा यांच्या एका पथकाने स्वातंत्र्यचौकात छापा टाकला असता या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी शेख समीर शेख सगीर (वय-२३) रा. शिवाजीनगर याला अटक ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर त्याने नवल लालचंद कुंभार (वय- २५) रा.खंडेरावनगर, सुनील मधुकर अहिरे (रा.हरिविठ्ठलनगर), झुल्फीकार अली निसार अली सैय्यद (वय- २१) रा.इस्लामपूरा, धानोरा.ता.चोपडा, मुसेफ शेख कय्युम (वय-२८) रा.मास्टर कॉलनी, डॉ.आले मोहम्मद खान, सैय्यद आसीफ इसा (वय-२२) रा.सुप्रीम कॉलनी, अझीम शहा दिलावर शहा (वय-२०) रा.सालार नगर, जुनेद शहा जाकीर शहा (वय-२३ ) रा.सालारनगर या टोळीला अटक करण्यात आली.

८ अटकेत, डॉक्टर फरार

टोळीतील इतर सदस्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच हयात हॉस्पिटलमधील डॉक्टर हा घटनास्थळून पसार झाला. ही कारवाई पोलीस निरिक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे, विजय कोळी, कैलास सोनवणे, महेश महाले, रवींद्र मोतीराया, रवींद्र तायडे, मनोज पवार, प्रशांत पाठक, रवींद्र साबळे, फिरोज तडवी यांच्या पथकाने केली. या टोळीकडून ५ रेमडीसिवीर इंजेक्शन व दुचाकी, मोबाईल असा २ लाख ४६ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मेडिकलचालकासह अटक

दुसऱ्या पथकातील निरिक्षक विलास शेंडे, राजेंद्र बोरसे, महेंद्र बागुल, प्रवीण भोसले, रवींद्र तायडे, मनोज पवार, योगेश ठाकूर यांनी नवकार फार्माचे आकाश अनिल जैन रा. आंबेडकर नगर, शुभम राजेंद्र चव्हाण (वय- २२) रा. झूरखेडा ता. धरणगाव, मयूर उमेश विसावे (वय-२७) श्रध्दा कॉलनी या तिघांना रेमडेसिविर २२ ते ३३ हजारात विक्री करत असताना अटक केली. त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसह दुचाकी व मोबाईल असा १ लाख ३७ हजार ९०० रूपयांचा माल जप्त केला. जळगाव शहर पोलिसठाण्यात एकूण १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भुसावळ बाजारपेठ ठाण्यात देखील दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच दिवसांची कोठडी

स्वातंत्र्य चौकातून अटक करण्यात आलेल्या आठ जणांच्या टोळीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

इंजेक्शन घेतल्यानंतर माहिती द्या

नातलगांना रुग्णाच्या काळजीपोटी इंजेक्शन जादा दर देऊन घ्यावेच लागते. अशा स्थितीत ते जादा दराने खरेदी करावे, मात्र काम झाल्यानंतर तरी पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी यावेळी केले. त्यासाठी त्यांनी ७२१९०९१७७३ या क्रमांकार व्हॉट्सपद्वारे तक्रार करण्याबाबत सांगितले आहे.

जळगाव प्रमुख केंद्र

रेमडेसीव्हिर, टॉसीलीझुमॅब यासारख्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांच्या काळ्या बाजाराचे जळगाव प्रमुख केंद्र बनल्याबाबत ‘सकाळ’ने गेल्याच आठवड्यात वृत्त दिले होते, ते खरे ठरले आहे. पोलिसांनी जी कारवाई केली, ती हिमनगाचे एक टोक असून योग्य दिशेने कारवाई केली तर यात आणखी बडे मासे, मेडिकल माफिया अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.