esakal | खासगी हॉस्पिटलला जादा दर अन्‌ ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने; ‘आयएमए’चे साकडे

बोलून बातमी शोधा

oxygen
खासगी हॉस्पिटलला जादा दर अन्‌ ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने; ‘आयएमए’चे साकडे
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असून, खासगी आरोग्य यंत्रणाही या युद्धात सक्षमपणे लढत आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना जादा दराने, मागणीपेक्षा अल्प व कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. अशा स्थितीत खासगी हॉस्पिटलची कसरत होत असून, रुग्णांचा जीव टांगणीला लागण्याची स्थिती आहे.

या गंभीर प्रश्‍नाबाबत आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन त्यांना या सर्व गोष्टींबाबत अवगत केले. या वेळी अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्‍याम चौधरी, डॉ. अनिल पाटील, स्नेहल फेगडे, दिलीप महाजन आदी उपस्थित होते.

अशा आहेत समस्या

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना समस्या वाढत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे ऑक्सिजनचे पुरवठादार सिलिंडर भरून न देता कमी प्रमाणात (वस्तुमान) आणि अतिशय कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे. शासनाने ऑक्सिजन सिलिंडरचे दर ठरवून दिलेले असतानाही पुरवठादारांकडून त्या शासकीय दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे रोखीने घेऊन सिलिंडर दिले जात आहे.

‘नॉन कोविड’साठी कसरत

नॉन कोविड रुग्णालयांतही नियमितपणे होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी भूल देताना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते; परंतु आम्हाला त्यासाठी नियमितपणे सिलिंडर पुरवठा होत नाही आणि जो होतो तोसुद्धा कमी दाबाने भरलेल्या सिलिंडरचा आणि अवास्तव दराने आकारणी करून होतो आहे.

..तर कोण जबाबदार?

यामुळे ऑक्सिजन पुरवठा वेळेत आणि ठरलेल्या दराने न झाल्यामुळे रुग्णांच्या होणाऱ्या जीवितहानीला कोण जबाबदार राहील, असा प्रश्‍न आयएमएने उपस्थित केला आहे. या विषयात गांभीर्याने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.