
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विनाकारण प्रवास; तर महिनाभराचा पगार क्षणात जाणार
जळगाव : ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अकारण प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तब्बल १० हजारांच्या दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केली जात नाही. नियमावलीत दिलेल्या कारणांशिवाय व नियमावलीतील नियमांचे पालन न करता केलेला प्रवास दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
आजपासून अंमलबजावणी
ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात २२ एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे. ती १ मे २०२१ सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतर जिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी/पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.
Web Title: Marathi News Jalgaon News Lockdown Breack The Chain Travling Collector Abhijit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..