esakal | विद्यार्थी घडविणारा शिक्षक..मनरेगाचा मजदूर; पंपावर पेट्रोल विकण्याची वेळ

बोलून बातमी शोधा

teacher work petrol pump

विद्यार्थी घडविणारा शिक्षक..मनरेगाचा मजदूर; पंपावर पेट्रोल विकण्याची वेळ

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : शिक्षणामुळे चांगले व्यक्ती घडतात, तसेच चांगले- वाईट ओळखण्याची समज देखील शिक्षणामुळे येते. जीवनाचा स्तर उंचावण्यात शिक्षणामुळे मदत होते. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनस्तर उंचावण्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक आपली सहायता करतात. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षकांनाच आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे.

शिक्षकांना मनरेगा मजदूर म्हणून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. खासगी शाळेतील शिक्षकांचे दिवसंदिवस जीवन हलाखीचे होत आहे. कोरोना संकटामुळे सर्व शाळा व कॉलेज बंद आहे. इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांचा पगार बंद आहे. शाळा सुरू नसल्यामुळे खाजगी शाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आपला उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या माध्यमाचा शोध घ्यावा लागत आहे. वेतन नसल्याने जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. शासनाला या शिक्षकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

शिक्षकांना कोणतेच पाठबळ नाही

राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षकांच्या नशिबात कोरोना संकटामुळे त्यांच्या जीवनात अंधकार आलेला आहे. कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले; तरी शिक्षकांच्या आर्थिक स्थितीत थोडासाही फरक झालेला दिसून येत नाही. शिक्षकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संस्थाचालकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची सहायता केलेली दिसून येत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने या शिक्षकांच्या समर्थनात कोणतेही आंदोलन, अभियान केलेलं नाही. भुसावळ शहरातील शिक्षक दिनेश रमेश खडसे (एमए, बी.एड) यांना लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागल्याने साकेगाव स्थित बालाजी पेट्रोल पंप येथे काम करत आहे.

मजुरी करण्याची वेळ

भुसावळ तहसिल क्षेत्रात दीडशे पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षक काम करत आहे. मात्र कोरोना काळात लॉकडाऊनमुळे खाजगी शाळा शिक्षकांच्या पोटावर पाय पडला आहे. शाळा बंद असून शिक्षकांना ऑनलाईन काम दिलेले आहे. प्रायव्हेट शाळेमध्ये शाळा प्रशासनाने काही शिक्षकांनाच कामावर ठेवलेले आहे. बर्‍याच शिक्षकांना नोकरी पासून हात धुण्यास भाग पाडलेले आहे. परिवाराचे पालण-पोषणसाठी खाजगी शाळेतील शिक्षकांना मजुरी करावी लागत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल विकण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे.

खासगी शाळेतील शिक्षकांचा प्रश्‍न बिकट

काही भाजीपाला विकून शेतात काम करून तर काही कंपन्यांमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. काही शिक्षक हॉटेलमध्ये सुद्धा काम करत आहे मात्र दुर्दैव असे की शिक्षकांच्या या कठीण परिस्थितीत दुसरे वर्ष सुरू झाले तरी शिक्षकांना अद्यापही पगार मिळाला नाही आणि जो काही तुटपुंजा मिळत आहे त्यात देखील कपात होत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांच्यामुळेच विद्यार्थी उंच पदावर जाऊन पोहोचतात. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक अल्प वेतन घेऊन ऑनलाईन शिक्षण देत आहे. भविष्यात शाळेस अनुदान मिळेल या आशेने ते आपले प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहे.

संपादन- राजेश सोनवणे