esakal | आता शासकीय रुग्णालयातही ‘रेमडेसिव्हर’चा तुटवडा; रुग्णांना बाहेरून आणण्याचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon civil

आता शासकीय रुग्णालयातही ‘रेमडेसिव्हर’चा तुटवडा; रुग्णांना बाहेरून आणण्याचा सल्ला

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : खासगी रुग्णांलयाना रेमडेसिव्हर’ इंजेक्शनचा तुटवडा आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हरसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला. त्याद्वारेही आता मागणीच्या अल्पप्रमाणात खासगी रुग्णालयांना रेमडेसिव्हर पुरविले जाते. शासकीय रुग्णालयात रविवारपर्यंत रेमडेसिव्हर’चा स्टॉक उपलब्ध होता. मात्र आता तोही संपण्याच्या मार्गावर आहे. गरज असेल तरच रुग्णांना रेमडेसिव्हर दया, अन्यथा रेमडेसिव्हर विना उपचार करा असे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या अधिन असलेल्या इकरा युनानी महाविद्यालयाचे कोविड सेंटर, मोहाडीतील रुग्णालयातही रेमडेसिव्हर’ विना उपचाराच्या सूचना दिल्या आहेत.

‘रेमडेसिव्हर’चे उत्पादन कमी होत असल्याने गेल्या पंधरा-वीस दिवसापासून रेमडेसिव्हरचा तुटवडा अधिक भासू लागला आहे. त्यात रेमडेसिव्हरच्या दराच्या वादामुळे अधिकच टंचाई निर्माण झाली. यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी रेमडेसिव्हरचा पुरवठा अन्न व औषध विभागाकडे सोपविला. कोविड सेंटरमधून या विभागाला दररोज लागणाऱ्या रेमडेसिव्हरची मागणी होते. त्याप्रमाणात हा विभाग सायंकाळपर्यंत रेमडेसिव्हरचा पुरवठा करते.

दावा ठरतोय फोल

जिल्ह्याला रोज दोन ते २४०० रेमडेसिव्हरची गरज आहे. मात्र उपलब्ध होतात ५०० ते ६००. यामुळे आता मागणी केलेल्या रुग्णांना मागणीच्या तुलनेत अतिशय कमी पुरवठा होतो. यामुळे खासगी रुग्णालये रुग्णांना बाहेरून कोठूनही रेमडेसिव्हर आणायची सक्ती करतात. विशेष म्हणजे रेमडेसिव्हर तुटवडा असताना काळ्या बाजारात रेमडेसिव्हर पंधरा ते पंचवीस हजारात उपलब्ध होते आहे. मागे जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रेमडेसिव्हर असल्याचा दावा केला होता. आता मात्र इकरा महाविद्यालयात चक्क बाहेरून रेमडेसिव्हर घेवून या असे रुग्णांना सांगितले जाते. वास्तविक इकरा महाविद्यालयाचे कोविड सेंटर शासनाचे ताब्यात घेतले असताना तेथे रुग्णालयातूनच रुग्णांना रेमडेसिव्हर दिले जाणे गरजेचे आहे. मात्र तेथे साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून रेमडेसिव्हर आणण्याचे डॉक्टर चिठ्ठी लिहून देत आहेत.

गरज असल्‍यासच रेमडेसिव्हीर मग आज स्‍टॉक नाही

जिल्हा कोविड रुग्णालयात रविवारी रूग्णालयातील रुग्णांसाठी रेमडेसिव्हर आले. मात्र ते सोमवारी संपले. नंतर स्टॉक आलेला नाही. मात्र जे रुग्ण आहेत त्यांना गरज असेल तरच रेमडेसिव्हर लावले जाते; असे जिल्हा कोविड रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. आजच्या तारखेत नवीन रुग्णांसाठी रेमडेसिव्हर उपलब्ध नाही.

‘रेमडेसिव्हर’ विना उपचार करावे

याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगितले, की इकरा महाविद्यालय व ग्रामीण भागातील रुग्णालयात रेमडेसिव्हरचा साठा संपला आहे. बाजारपेठेतच रेमडेसिव्हरची टंचाई आहे. रेमडेसिव्हर विना उपचार करून रुग्णाला बरे करण्याची ही संधी आहे. तशा सूचना शासकीय डॉक्टरांना दिल्या आहेत. खासगी डॉक्टरांनीही रेमडेसिव्हर न लावता उपचार करावेत. रुग्णांना बाहेरून रेमडेसिव्हर आणण्याची सक्ती करू नये. शासनाकडून रेमडेसिव्हर उपलब्ध झाल्यानंतर गरजूंनाच रेमडेसिव्हर दिले जातील.

संपादन- राजेश सोनवणे

loading image