esakal | World Banana Day..विदेशात केळी निर्यातीला हवी चालना; बनाना क्लस्टर नावालाच

बोलून बातमी शोधा

World Banana Day
World Banana Day..विदेशात केळी निर्यातीला हवी चालना; बनाना क्लस्टर नावालाच
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर (जळगाव) : संपूर्ण भारतात जळगाव जिल्ह्याचे नाव केळी उत्पादनासाठी आदराने घेतले जाते. जिल्ह्यात सध्या ४६ हजार हेक्टर केळी लागवडीतून सुमारे ३६ लाख टन केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यातील अतिशय अल्प केळी विदेशात निर्यात केली जात आहे. त्याचेही श्रेय केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर खासगी कंपन्यांचे असून, निर्यातवाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही गंभीरपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्याला आणि विशेषत: रावेर, यावल, मुक्ताईनगर या तालुक्यांना जे वैभव मिळाले आहे, ते केळीमुळेच. मात्र, केळीच्या निर्यातीत राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका केवळ बघ्याचीच आहे. जिल्ह्यातून दर वर्षी सुमारे एक हजार २०० कंटेनर्स केळी निर्यात होते. मात्र, त्यामागे खासगी कंपन्या आणि संबंधित केळी उत्पादक शेतकरी यांचे परिश्रम आहेत. केळी निर्यातीतून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनही देशाला मिळेल म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे.

‘अपेडा’ने प्रयत्न करण्याची गरज

जळगावला केळी निर्यात करणारा जिल्हा अशी ओळख निर्माण व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या ‘अपेडा’तर्फे जिल्ह्याला बनाना क्लस्टर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता या गोष्टीला तीन वर्षे होत आली; परंतु निर्यातवाढीसाठी फक्त कृती आराखडाच तयार करण्यात सारा वेळ खर्च झालेला आहे. निर्यातीसाठी काय करता येईल, याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. अपेडाकडून केळी निर्यातीसाठी कोणतीही योजना किंवा सवलत जाहीर झालेली नाही.

वर्षभरात केवळ ३६ लाख टन

सध्या वर्षभरात जिल्ह्यातून ३६ लाख टन उत्पादित केळीतून फक्त दोन लाख ४० हजार क्विंटल एवढीच केळी निर्यात होते. यात तालुक्यातील तांदळवाडी येथील महाजन बनाना एक्स्पोर्टसचे प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन, अटवाडा येथील रुची बनाना एक्स्पोर्टसचे विशाल अग्रवाल, रावेर येथील महाराष्ट्र बनाना एक्स्पोर्टसचे किशोर गनवाणी, कुंभारखेडा येथील अतुल महाजन हे शेतकरी आणि तांदलवाडी येथे उभी राहिलेली एकदंत बनाना एक्स्पोर्टस ही व्यापारी फर्म केळी निर्यात करीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर केळी निर्यात करणाऱ्या कंपन्यांवरील फर्म्सकडून केळी घेतात.

जगभरात का साजरा केला जातो केळी दिवस?

बुधवारी (ता. २१) एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार जागतिक स्तरावर केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ मध्ये युरोपात सर्वप्रथम केळी दिवस साजरा झाला. केळीचे महत्त्व वाढावे, केळीचा खप व विक्री वाढावी, हा यामागचा उद्देश होता. तेव्हापासून युरोपसह अमेरिकेतदेखील हा दिवस साजरा होतो, अशी माहिती केळीतज्ज्ञ आणि जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली. भारतातही तो कोरोनाचे नियम पाळून साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निर्यातवाढीसाठी मागण्या

- तालुक्यातून रेल्वेद्वारे केळीचे कंटेनर्स मुंबईतील बंदरात नेण्याची सोय हवी. त्यामुळे निर्यात होणाऱ्या केळीची गुणवत्ता टिकेल, वाहतूक खर्च आणि वाहतूक जलद होईल.

-‘अपेडा’कडून जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना, केळी कापणी, मजुरांना केळी निर्यातीसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण देणे.

- जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात केळी आहे, तिथे प्रत्येकी पाच लाख केळी खोडांसाठी एक असे छोटे छोटे पॅकेजिंग हाउस उभे करावे आणि डाळिंबाच्या धर्तीवर अनुदान द्यावे.

- निर्यातीसाठी कापणी केलेली केळी एकत्रित ठेवण्यासाठी किमान २५० कंटेनर्स (पाच हजार टन) क्षमतेचे मोठे कोल्डस्टोअरेज उभे करावे. त्यात प्रीकूलिंगचीही व्यवस्था असावी.

- रावेर, सावदा, निंभोरा, कजगाव, बऱ्हाणपूर या रेल्वे स्थानकांवर रेफर कंटेनर आणि कंटेनर प्लगिंगची व्यवस्था हवी. म्हणजे कंटेनर्सला आवश्यक तो वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.

- आंध्र प्रदेश सरकार तेथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४१ हजार रुपये फ्रूट केअर टेक्नॉलॉजीसाठी (बड इंजेक्शन, स्करटिंग बॅग्स आदीसाठी) अनुदान देते. तसेच टिश्यूकल्चर केळी रोपांना अनुदान देते, तसे राज्य आणि केंद्र सरकारने अनुदान द्यावे.

- केळी निर्यातीसाठी केंद्र सरकारच्या कृषी खात्यातील फलोत्पादन विभागातील जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी.

- केळी उत्पादक तालुक्यात शेतरस्त्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे.

- अमेरिका आणि युरोप या खंडांसह ज्या देशांत आपले केंद्रीय मंत्री दौरे करतात, तिथे केळी निर्यातीची शक्यता तपासून पाहावी.

- पाकिस्तानमध्ये सध्या केळीची छुपी निर्यात काश्मीरमधील व्यापारी करतात, ही निर्यात अधिकृतपणे झाल्यास वर्षभर जिल्ह्यातील केळीला बाजारपेठ आणि चांगले भाव मिळतील.

- भुसावळ रेल्वेस्थानकावर हवे तेव्हा कंटेनर्स उपलब्ध करून द्यावेत.

संपादन- राजेश सोनवणे