
जिल्ह्यात १६ डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाला आहे.
जळगाव : शहरासह जिल्ह्यात शनिवारी (ता. १२)पासून ढगाळ वातावरण व पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. असे वातावरण पिकांवरील रोगराईला आमंत्रण देते. सोबतच नागरिकांनाही व्याधी होत आहेत. ढगाळ वातावरण शक्य होईल तेवढ्या लवकर निवळण्याची गरज आहे. ज्वारी, हरभरा, गव्हाला वातावरण पोषक असले तरी कांदा, दादरला मारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या चोवीस तासांत फक्त अडीच मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाळ्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात १६ डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चक्क पावसाळ्यासारखा पाऊस पडत होता. रविवारी (ता. १३) सकाळीही काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती.
पिकांना फायदा, मात्र..
गारठा व पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी तीन- चार दिवसांनंतर असे वातावरण पिकांसाठी धोकादायक असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. रविवार सुटीचा दिवस होता. गारठ्यामुळे सर्वांनीच स्वेटर, मफलर घातलेले होते. काहींनी या वातावरणाची संधी साधत घरीच चहा, भजीचा आस्वाद घेतला. काहींनी आपल्या मित्रांना घरी बोलवून चहा, भजीचा पाहुणचार केला होता.