जळगावमध्ये रुग्ण कमी तरी पॉझिटिव्हीटी रेट वाढता 

सचिन जोशी
Tuesday, 1 December 2020

विशेष म्हणजे जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. तर, गेल्या २४ तासांत ६१ रुग्ण बरे झाले.

जळगाव : कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे चित्र असले तरी, चाचण्या कमी झाल्याने रुग्ण समोर येत नसल्याचे मानले जात आहे. मंगळवारी (ता. १) नवे २८ रुग्ण समोर आले, मात्र ते केवळ साडेपाचशे चाचण्यांमधून. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट सुमारे पाच टक्के आहे. तर गेल्या २४ तासांत एका मृत्यूसह ६१ रुग्ण बरेही झालेत. 

वाचा- चोरांची दुकानात मस्ती आणि बाहेर पोलिसांची गस्ती

जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होत होती. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र, अद्याप तरी ही लाट तीव्र स्वरुपात समोर आलेली नाही. गेल्या आठ- दहा दिवसांपासून नवे बाधित जास्त व बरे होणारे रुग्ण कमी अशी स्थिती होती. मात्र, तीन दिवसांपासून हे चित्रही बदलले आणि बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त दिसू लागली आहे. 

चाचण्याही कमी 
नवे रुग्ण कमी झाले असले तरी त्या तुलनेत चाचण्या नगण्य होत आहेत. मंगळवारी केवळ ५४५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे हा रेट जवळपास ५ टक्के आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. तर, गेल्या २४ तासांत ६१ रुग्ण बरे झाले. जळगाव शहरात मंगळवारी १० नवीन रुग्ण समोर आले तर भुसावळ तालुक्यात १४ रुग्ण सापडले. यावलला एक रुग्ण आढळला. उर्वरित सर्व तालुके निरंक राहिले. भुसावळ तालुक्यातील एका रुग्णाच्या मृत्यूने बळींची संख्या १३०० झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of patients decreases but the positivity rate increases