प्राप्तिकर, जीएसटी, व्यवसाय करासाठी दमछाक 

सचिन जोशी
Friday, 23 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाउन सुरु झाले. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर, घटकांवर झाला. व्यापारी वर्ग, व्यावसायिक, करसल्लागार, लेखपाल, सीए आदी सर्वच घटक त्यामुळे त्रस्त आहेत.

जळगाव : प्राप्तिकर, जीएसटी आणि व्यवसायकराचे विवरण भरण्याची प्रक्रिया एकाच महिन्यात व मुदतही ३१ ऑक्टोबर असल्याने व्यावसायिकांसह सीए, करसल्लागारांची दमछाक होत आहे. दिवसरात्र काम करूनही विवरणपत्रे भरणे कठीण जात असल्याने करसल्लागार, तज्ज्ञ असून, ही मुदत किमान मार्च २०२१ पर्यंत वाढवावी, अशी मागणी जळगाव जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने केली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाउन सुरु झाले. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर, घटकांवर झाला. व्यापारी वर्ग, व्यावसायिक, करसल्लागार, लेखपाल, सीए आदी सर्वच घटक त्यामुळे त्रस्त आहेत. यापैकी बरेच जण स्वत: कोरोनाबाधित आहेत, तर काहींचे कुटुंबीय, कार्यालयीन सहकारी बाधित असल्याने हे क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले आहे. 

विवरणपत्रे भरण्याची घाई 
अशा स्थितीत सरकारने प्राप्तिकर (आयकर), जीएसटी व व्यवसायकराची विवरणपत्रे एकाचवेळी म्हणजे या महिन्यात भरून पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे ही विवरणपत्रे भरण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. प्राप्तिकरासाठी आधी ३० सप्टेंबर अंतिम मुदत होती. सरकारने ती वाढवून ३१ ऑक्टोबर केली आहे. 

नमुने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध 
परंतु, ३० सप्टेंबर अंतिम तारीख असेल, तर सर्व विवरणपत्राचे नमुने सरकारने १ एप्रिल २०२० ला अंतिम करून प्रसिद्ध करणे गरजेचे होते. ते सरकारने सप्टेंबर २०२०ला प्रसिद्ध केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या महिन्यात हे नमुने प्रसिद्ध केले जातात, तेव्हापासून सहा महिन्यांची मुदत देणे अनिवार्य आहे. मात्र, या वेळी तसे झाले नाही. 

अशी आहे गर्दी 
अशा स्थितीत आता ‘जीएसटी’ची विवरणपत्रे, त्याखालील वार्षिक विवरणपत्र, ३१ मार्च २०१९ अखेरची विलंबित वा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्रे, प्राप्तिकराखालील ३१ मार्च २०२० अखेरचे लेखापरीक्षण अहवाल, व्यवसाय कराची विवरणपत्रे, या सर्वच बाबी याच महिन्यात तयार करून भराव्या लागणार आहेत. त्यामुळे सर्वांचीच दमछाक होत आहे. त्यासाठी ही मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष सीए मगन पाटील, सचिव सीए अनिलकुमार शाह यांनी केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon october 31 deadline for income tax