अश्‍लील व्हिडिओद्वारे राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिकाऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

मुंबईवरून जळगावला परतत असताना महिलेचा फोन आला. त्यांनी खासगी काम असून, भेटायचे आहे, असे सांगितले. अभिषेक पाटील यांनी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेटायला या, असे सांगितले.

जळगाव : शहरातील माझ्या हितचिंतकाने महिलेला सुपारी देऊन अश्‍लील फोटो, व्हिडिओ बनवून मला फसविण्याचा प्रयत्न केला. या महिलेने दाखविलेले फोटो सादर करत त्या महिलेने मला फसविण्यासाठी काही लोकांनी पैसे दिल्याचे सांगितले. याबाबत पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली. 
या घटनेची माहिती देण्यासाठी त्‍यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले, की १५ ऑक्टोबरला मुंबईवरून जळगावला परतत असताना महिलेचा फोन आला. त्यांनी खासगी काम असून, भेटायचे आहे, असे सांगितले. अभिषेक पाटील यांनी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेटायला या, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय बंद असल्याने पाटील यांनी त्या महिलेला रिंग रोडवरील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले. या वेळी त्या महिलेने सांगितले, की मी मोठ्या राजकीय लोकांना मुली पुरविण्याचे काम करते. मला एका व्यक्तीने आगाऊ रक्कम देत अभिषेक पाटील यांचे अश्‍लील फोटो व व्हिडिओ काढून हवे आहेत. त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविल्याचे सांगत, तुमचे राजकीय कार्य चांगले असल्याने मला तुमचे आयुष्य खराब करावयाचे नाही, असे सांगितले. 
हा सर्व घटनाक्रम पत्रकार परिषदेत मांडल्यावर पाटील म्हणाले, की भाजप नगरसेवकाने अभिषेक चांगला माणूस आहे. त्याच्याबाबत असे करू नको, असेही तिला सांगितले, त्यामुळे त्या महिलेने स्वतः येत तुम्हाला फसविले जात असून, मोठा राजकीय कट रचला जात असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत पोलिसांना तसेच पोलिस अधीक्षकांना भेटून घटना सांगितली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon the office bearer of the nationalist party