esakal | परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

बोलून बातमी शोधा

hoom quarantine
परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोनाचा संसर्ग वाढला असतांना आता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन अध्यादेशाच्या माध्यमातून सहा राज्यांमधून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करून त्यांना सक्तीने १४ दिवसांचे होम क्वॉरंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात दिल्ली, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्ली एनसीआर येथून येणार्‍या प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत या सहा राज्यांमधून येणार्‍या सर्व प्रवाशांची नोंद ठेवून त्यांची रेल्वे स्थानकावरच रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीतून पॉझिटीव्ह आढळलेल्यांवर उपचार करण्यात येतील. तर प्रवासी निगेटीव्ह आढळला तरी त्याला त्याच्या घरी १४ दिवस होम क्वॉरंटाईन रहावे लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्याची व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

रेल्वे स्थानकावर नोडल अधिकारी

जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, रावेर, अमळनेर या रेल्वे स्थानकांवर उतरणार्‍या सर्व प्रवाशांची माहिती ही रेल्वेतील नोडल अधिकार्‍याच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे येणार आहे. या स्थानकांवर आलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग आणि रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्याची जबाबदारी ही स्थानीक महापालिका/पालिका प्रशासन वा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची राहणार आहे.

उल्लंघन करण्यांवर गुन्हा दाखल होणार

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी़ केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादंवि १८६० (४५)चे कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे