ग्रामीण भागातील रुग्णांची होणार सोय...सर्व रुग्णालयांत ऑक्‍सिजन बेड !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा सामाना कोरोनाच्या बरोबरीने करावा लागणार आहे. पाण्यातून आजार न होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.

जळगाव :  जिल्ह्यात 12 ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्‍सिजन बेडची सुविधा येत्या 15 दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्याच ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन देता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की 12 ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी 50 ऑक्‍सिजन बेडचे काम 15 दिवसांत पूर्ण होईल. कोविड रुग्णालयात 300 व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 400 ऑक्‍सिजन बेड उभारणीचे काम सुरू आहे. चोपडा, अमळनेर, जामनेर या ठिकाणी लोकसहभागातून कोविड केअर सेंटरमध्ये चांगले काम सुरू आहे. शुक्रवारी (ता. 3) सर्वाधिक 972 चाचण्या घेतल्या. या चाचण्या रोज बाराशे होण्याकडे कल आहे. संशयित रुग्ण शोधमोहिमेत रुग्ण वाढणार आहेत. 99 टक्‍के रुग्णांचे रिपोर्ट 48 तासांत देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आदी लक्षणे दिसली, तरी तपासणी करावी. कोरोनाला घाबरू नये. जास्त त्रास होऊन उपचार घेण्यापेक्षा लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावा. यामुळे लवकर बरे व्हाल. 

जलजन्य आजारांची काळजी घ्या 
श्री. राऊत म्हणाले, की पावसाळ्यात जलजन्य आजारांचा सामाना कोरोनाच्या बरोबरीने करावा लागणार आहे. पाण्यातून आजार न होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. घराभोवती पाणी साचू देऊ नये. पिण्याचे पाणी उंचावर ठेवा. याबाबत सार्वजनिक पाणीपुरवठा विभागालाही सूचना दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Oxygen beds in all rural hospitals Patients will be facilitated