‘एसटी’चे वाटोळे.. माल भरलेली बस कागदावर रिकामी 

राजेश सोनवणे
Friday, 4 December 2020

लॉकडाउनच्या काळात त्‍यास प्रतिसाददेखील मिळाला. यामुळे लॉकडाउननंतरदेखील एसटीने ही सेवा अविरत सुरू ठेवली. पण यात एसटीची चाके तोट्यात रुतत असली तरी काही मंडळी ‘वर’ येत आहे. 

जळगाव : कोरोना व्‍हायरसने ‘लालपरी’ला आपला मार्ग बदलावा लागला होता. लॉकडाउनमध्ये उत्पन्न नसल्‍याने ‘लालपरी’ने मालवाहतूक करण्यास सुरवात केली; परंतु प्रवासी वाहतुकीप्रमाणे यातदेखील बसचे चाक तोट्यातच रुतले. अर्थात यात प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष अधिकाऱ्यांच्या सहभागाने नियमबाह्य वाहतूक होऊ लागली. यात जळगाव विभागात तर माल वाहून नेणारी बसची फेरी कागदावर रिकामी दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे, तर दुसरीकडे क्षमतेपेक्षा जास्‍त मालवाहतूक हा रोजचाच भाग झाला आहे. 
राज्‍य परिवहन महामंडळाची बस अर्थात लालपरी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी...’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावत आहे. प्रवासी वाहतूक करताना बऱ्याचदा रिकामी जात असल्‍याने तोट्यातच धावत आली आहे. यात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लागलेल्‍या लॉकडाउनमुळे एसटीची चाके अधिकच तोट्यात रुतली. कोरोनामध्ये उद्‌भवलेल्‍या आपत्तीमध्ये उत्पन्नाच्या दृष्‍टीने एसटीने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रत्येक आगारात काही गाड्यांमध्ये अंतर्गत बदल करून गाड्या मालवाहतुकीसाठी सज्ज ठेवल्या. लॉकडाउनच्या काळात त्‍यास प्रतिसाददेखील मिळाला. यामुळे लॉकडाउननंतरदेखील एसटीने ही सेवा अविरत सुरू ठेवली. पण यात एसटीची चाके तोट्यात रुतत असली तरी काही मंडळी ‘वर’ येत आहे. 

कागदोपत्री काही, तर प्रत्‍यक्षात दुसरेच 
‘एसटी’ची मालवाहतूक सेवा सुरू करताना त्‍यात नियमाप्रमाणे दहा टन मालवाहतूक करण्याची परवानगी आहे. असे असताना कागदावर नियमाप्रमाणे दाखविले जाते. प्रत्यक्षात मात्र १२ ते १४ टन अवजड वाहतूक केली जात आहे. विशेष म्‍हणजे खासगी ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या दरापेक्षा कमी भाड्यात एसटी धावत असताना तिच्यातून विनाभाडे दोन ते चार टनांची जादा वाहतूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय जळगाव विभागात दोन आठवड्यांपूर्वी बसमधून माल वाहतूक झाली असताना त्‍या बसची फेरी खाली झाल्‍याचा प्रकार घडला आहे. प्रत्येक विभाग आणि आगारात होणाऱ्या या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्‍यामुळे ‘एसटी’ला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. 
 
कंपनी-अधिकारी यांचा थेट कॉन्टॅक्‍ट 
एसटीचे बुकिंग केल्‍यानंतर मालपुरवठादार कंपन्या, काही मालवाहतूकदार कंपन्या आणि इतरांचा समावेश असतो. एसटीला दहा टन मालवाहतुकीसाठी प्रतिकिलोमीटर ३८ ते ४० रुपये याप्रमाणे भाडे ठरवले; परंतु दहाऐवजी प्रत्यक्षात १२ टनांपर्यंत माल भरून वाहतूक होते. ज्याला माल पाठविला जातो, त्याला वजनाप्रमाणे बिल पाठविले जाते. चालक केवळ वाहतुकीची जबाबदारी पार पाडतात. याबाबत चालकाने विचारणा केल्‍यास पुरवठादाराकडून ‘साहेबांशी बोलणे झाले आहे...’ असे उत्तर दिले जाते. अर्थात जास्‍तीच्या वाहतुकीचे पैसे संबंधित अधिकाऱ्याच्या खिशात जात असतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parivahan bus malvahtuk fraud