`एसटी`च्या गाडीने जाऊ..’ हे गीत पाहिल्‍यावर नक्‍कीच वाटेल चला एसटीने

राजेश सोनवणे
Sunday, 4 October 2020

कोणत्‍या एजन्सीला काम नाही की, कोणत्‍या कलावंतांना आमंत्रित करण्यात आले नाही. विशेष म्‍हणजे महामंडळाकडून देखील यासाठी काही आदेश नव्हते. पण कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेवून ही अनोखी जाहिरात केली आणि ती हिट देखील झाली.

जळगाव : ‘एसटी’च्या गाडीने जाऊ..सौंदर्य देशाचं पाहू’ या ओळींनी सुरू होणारे गीत ते देखील लालपरीची जाहिरात करणारे; सोशल मिडीयावर सध्या धूम करत आहे. अगदी प्रोफेशनल वाटेल अशा प्रकारची जाहिरात राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी साकारली आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नवी उमेदीने धाऊ लागलेल्या लालपरीची चर्चा मात्र जोरात आहे.
`प्रवाशी हिताय, प्रवाशी सुखाय` हे ब्रीद घेऊन गेल्‍या बहात्तर वर्षापासून लालपरी धावत आहे. शहरापासून खेळ्यांपर्यंत धावणारी एसटी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देत आली आहे. पण कोरोनाच्या संकटात अडकलेल्‍या लालपरीची कधी नव्हे ती जाहिरात ऐकण्यास मिळत आहे. यासाठी कोणत्‍या एजन्सीला काम नाही की, कोणत्‍या कलावंतांना आमंत्रित करण्यात आले नाही. विशेष म्‍हणजे महामंडळाकडून देखील यासाठी काही आदेश नव्हते. पण कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेवून ही अनोखी जाहिरात केली आणि ती हिट देखील झाली.

जळगावची टिमने केले काम
एसटीतील प्रवास सुरक्षित प्रवास हे ब्रीद महामंडळाचे राहिले आहे. तरी देखील प्रवाशांमध्ये ही भावना निर्माण करण्यासाठी चालक- वाहकांनी पुढाकार घेतला आणि गीताच्या माध्यमातून जाहिरात केली. याचे संपुर्ण दिग्‍दर्शन जळगाव आगारातील वाहक तथा एसटी कामगार सेनेचे राज्‍य प्रसिद्धी प्रमुख गोपाळ पाटील यांनी केले आहे. तर गीतातील प्रमुख भुमिका अमळनेर आगारातील महिला वाहक शीतल पाटील यांनी बजावली आहे. तर अन्य महिला या कर्मचाऱ्यांच्याच पत्‍नी आहेत. तर सेवानिवृत्‍त झालेले आसाराम फंगाळ (औरंगाबाद) हे गीतकार आहेत.

कोरोनाने बदलले चित्र
कोरोनामुळे सगळे चित्र बदलले आहे. यात `एसटी`ला देखील जाहिरातीची गरज भासली. व्हीडीओसह सुंदर चाल दिलेल्या गाण्यातून जाहिरात केली. यात सहा महिला बस्थानकावर `एसटी`चे कौतुक गीत गात एकमेकींना बसने प्रवास करण्याचा आग्रह करीत आहे. या `एसटी`चे विविध गुण, वैशिष्ठ्ये त्यात आहेत. ही जाहिरात नक्कीच आकर्षीत करत असून, प्रत्‍येक व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर याचे व्हिडीओ  शेअर केले जात असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे.

रिकाम्‍या वेळेत केले चित्रीकरण
जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी एसटीची जाहिरात बनविताना ड्युटी सांभाळून मिळणाऱ्या फावल्‍या वेळेत चित्रीकरण केले आहे. याचे चित्रीकरण जळगाव बसस्‍थानकासह ज्या- ज्या ठिकाणी एसटी बस गेलेल्या होत्या त्या ठिकाणी शूटिंग केले गेले होते. त्‍याचे एकत्रिकरण करून एडीटींगद्वारे सुंदर व्हिडीओ बनविण्यात आला आहे.

एसटीची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांची आता एसटीला वाट पहावी लागत आहे. कोरोनामुळे हे चित्र पालटले असून, एसटीतील प्रवास हा नेहमी सुरक्षित राहिला असून, ही भावना प्रवाशांमध्ये जागृत करण्याच्या दृष्‍टीने व्हिडीओ बनविण्यात आला. जळगाव विभागातील चालक- वाहकांचे यात योगदान राहिले आहे.
- गोपाल पाटील, वाहक, जळगाव आगार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parivahan bus song social media hit