बालाजी रथाची पाचपावली; परंपरा ठेवली अखंडीत

संजय पाटील
Tuesday, 27 October 2020

पारोळा बालाजी संस्‍थानतर्फे काढण्यात येणारा बालाजी यात्रोत्‍सव मिरवणूक रद्द करण्यात आली. परंतु सकाळी १०.४८ मिनीटांनी रथ हलविण्याचा मुहूर्त होता. त्या आधी सकाळी नऊला मानाची वंशाजाची पूजा मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी सपत्नीक केली.

पारोळा (जळगाव) : बालाजी संस्थांनतर्फे ३८० वर्षाची परंपरा अखंडित ठेवत पाच पाऊल रथ ओढून मोजक्याच विश्वस्थांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात आला.
पारोळा बालाजी संस्‍थानतर्फे काढण्यात येणारा बालाजी यात्रोत्‍सव मिरवणूक रद्द करण्यात आली. परंतु सकाळी १०.४८ मिनीटांनी रथ हलविण्याचा मुहूर्त होता. त्या आधी सकाळी नऊला मानाची वंशाजाची पूजा मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी सपत्नीक केली. पूजा आटोपल्यावर श्री बालाजी महाराज रथावर विराजमान झाले. त्यानंतर लक्ष्मी रमना गोविंद बालाजी महाराज की जय या नाम घोषात रथ जागेवरून हलला. 

जॅकवर बारा टनचा रथाची दिशा फिरविली
सुमारे १२ टन वजन असलेला रथ हा पाच पाऊल पुढे गेल्यावर जॅकच्या सहाय्याने जागेवर फिरविण्यात आला. व पुन्हा मंदिराच्या परिसरात ‘श्री’चा रथ आल्यावर आरती करून श्री रथावरून खाली येऊन मंदिराच्या गर्भगृहात गेले. रथ जॅकवर फिरविण्यात आल्याचे बघून सर्वांचे डोळ्यांचे पारणे फिटले. जागेवर रथ जॅकवर फिरल्याचे क्लिप सोशल मिडीयाला व्हायरल झाली. यावेळी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, विश्वस्त ए. टी. पाटील, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, प्रकाश शिंपी, अरुण वाणी, संजय कासार, केशव क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिराच्या चौफेर बॅरिकेट्स
कोरोनाच्या संकटाच्या सावटात यंदाचा रथोत्सव परंपरा टिकविण्यासाठी फक्त पाच पाऊल ओडून पुन्हा जागेवर रथ लावण्यात आल्या. गर्दी होऊ नये म्हणून मंदिराच्या चौफेर बॅरिकेटस लावण्यात आले होते. शिवाय मोठा पोलीस बंदोबस्त देखील हेाता. रथ व मंदिर परिसरात गर्दी न करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्‍याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक चोपडा विभाग सौरभ अग्रवाल यांनी भेट देत पारोळा पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, अमळनेर पीएसआय श्री. लबडे, भडगाव पीएसआय सुशील सोनवणे, पाचोरा पीएसआय विजया वसावे, पारोळा पीएसआय रविंद्र बागुल, निलेश गायकवाड यांच्यासह पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parola balaji rath utsav celebreat