जळगाव शहरातील रखडलेले कामांना लवरच सुरवात होणार ! 

भूषण श्रीखंडे
Friday, 23 October 2020

जळगाव शहरात पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्याचे मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मक्तेदाराकडून उशीर होत असल्याने त्याला यापूर्वी नोटीस बजावली आहे.

जळगाव ः शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकेच्या फंडातून कामे केली जाणार आहे.यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून मक्तेदार पुढे येत नसल्याने महापौर आणि आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर मक्तेदार कामे करण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच एलईडी आणि अमृतच्या कामासाठी खोदलेल्या चाऱ्या बुजविण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. 

महानगर पालिकेत आज आढावा बैठक महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या दालनात घेतली. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी, सुनील महाजन, ऍड.मुजुमदार, उपायुक्त संतोष वाहुळे, अभियंता अरविंद भोसले, प्रकाश पाटील, योगेश बोरोले आदी उपस्थित होते. 

महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांनी शहरातील सर्व कामांचा आढावा घेतला. त्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांचे इस्टीमेट तयार करून ठेवा, ज्याठिकाणी नाल्याचे पाणी घरात घुसते तेथे दुरुस्तीकामी नाल्यांच्या भिंती उंच करण्याचे प्रस्ताव तयार करा, लहान गल्लीत ६ मीटर काँक्रीटचे रस्ते तयार करा अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी केंद्राकडून निधी मिळवू असे आमदार भोळेंनी सांगितले. 

एलईडीच्या मक्तेदाराला बजावणार नोटीस 
जळगाव शहरात पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्याचे मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मक्तेदाराकडून उशीर होत असल्याने त्याला यापूर्वी नोटीस बजावण्यात आलेली असून तरीही काम पूर्ण होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील प्रत्येक विद्युत खांबाची माहिती घेत एलईडी लाईटचे बसविण्याचे अभियंत्यांनी नियोजन करावे तसेच मक्तेदाराला नोटीस बजवावी अशा सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या. तसेच तीन महिन्यात काम पूर्ण करून घ्यावे असेही ते म्हणाले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The pending works in Jalgaon city will be started soon