डाॅक्टरांना देखील हवी शस्त्र वापरण्याची परवानगी !

चेतन चौधरी 
Saturday, 24 October 2020

प्रत्येक महिन्यात खून, विनयभंग, दरोडा, चोरी, अत्याचार, मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे. केवळ खंडणी मागणेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे.

भुसावळ  : भुसावळ शहरातील डॉ.स्वप्नील कोळंबे यांना खंडणीची मागणी करून धमकी देण्यात आली. तर सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली, यातील सर्व आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर करावी, तसेच डॉक्टरांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेता, डॉक्टरांना स्वरक्षणार्थ शस्त्र वापरण्याची परवानगी देण्याची मागणी भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

आवश्य वाचा- भाजप कार्यालयाला लागले कुलूप; खडसेंच्या पक्षांतरानंतर मुक्‍ताईनगर येथील चित्र

निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे. अस काहीस चित्र तयार होत आहे, किमान प्रत्येक महिन्यात खून, विनयभंग, दरोडा, चोरी, अत्याचार, मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे. केवळ खंडणी मागणेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे. शुक्रवारी (ता. 23) सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. वैद्यकीयआघाडीतर्फे याचा तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस यंत्रणेने येत्या 8 दिवसात खंडणीखोरांना पकडावे अन्यथा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, जळगाव महानगर अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, सरचिटणीस डॉ. जीवन पाटील उपस्थित होते.

... या आहेत मागण्या
खंडणीचा गुन्हाबाबत जलद गतीने तपास यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना 8 दिवसात अटक करण्यात यावी. खटला जलद गतीने न्यायालयात चालवून कठोरपणे शिक्षा देण्यात यावी.  डॉ.कोळंबे, डॉ. चौधरी आणि परिवाराला संरक्षण देण्यात यावे. भुसावळ शहरात मिलिटरी, पँरामिलीटरी, राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे, गावठी कट्टा, तलवारी आदी शोध मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी. सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon permission for doctors to use the weapon they want for self-defense