रेडक्रॉसमध्ये प्रारंभ; जळगावातही "प्लाझ्मा थेरपी'ने उपचार शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

महाराष्ट्रात प्लाझ्मा फेरेसिसची ट्रायल घेण्यास सुरवात करण्यात आली. 
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा संचालित रक्तपेढीत टेरुमो पेनपॉल कंपनीची ट्रिमा मशिन कार्यरत असून सीडीएससीओ मुंबई आणि अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी प्लाझ्मा फेरेसिस एक अतिरिक्त उत्पादन निर्मितीसाठी मान्यता दिली.

जळगाव ः इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीमध्ये प्लाझ्मा फेरेसिसला सुरवात करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील केईएम हॉस्पिटल रक्तपेढीत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्‌घाटन केले. जळगाव शहरातही रेडक्रॉस सोसायटीचा यात सहभाग असून या थेरपीद्वारे जळगावातही रुग्णांवर उपचार शक्‍य होणार आहे. 

रेडक्रॉस भवन येथील सभागृहात ऑनलाइन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्‌घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रा. डॉ. घोडके व प्रा. डॉ. विजय गायकवाड, शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. उमेश कोल्हे, रेडक्रॉसचे पदाधिकारी उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जळगाव रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीचा उल्लेख करत कौतुक करून अभिनंदन केले. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीद्वारे संकलित झालेल्या प्लाझ्माव्दारे जे रुग्ण कोरोना बाधित असून गंभीर अवस्थेत आहे. त्यांच्यावर प्लाझ्मा देऊन उपचार केले जाणार आहेत. त्याची सुरवात दिल्ली सरकारने केली असून गंभीर स्वरूपातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होत आहेत. महाराष्ट्रात प्लाझ्मा फेरेसिसची ट्रायल घेण्यास सुरवात करण्यात आली. 
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा संचालित रक्तपेढीत टेरुमो पेनपॉल कंपनीची ट्रिमा मशिन कार्यरत असून सीडीएससीओ मुंबई आणि अन्न व औषध प्रशासन नाशिक यांनी प्लाझ्मा फेरेसिस एक अतिरिक्त उत्पादन निर्मितीसाठी मान्यता दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय जळगाव आणि रेडक्रॉस रक्तपेढीसमवेत सामंजस्य करारावर सह्या झाल्या आहेत. 

रुग्ण बरे होण्यास मदत 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यावर प्रभावी उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून प्लाझ्माफेरेसीस थेरपी हे रामबाण सिद्ध होईल व रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होईल; अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे; असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Plasma therapy is also possible in Jalgaon, Start in the Red Cross