जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू 

सचिन जोशी
Friday, 13 November 2020

चार महिन्यांत कोरोना संसर्गाने उच्च पातळी गाठली. दररोज आठशे, हजारांवर रुग्ण आढळून येत असताना सद्य:स्थितीत एकूण रुग्णसंख्या ५४ हजारांच्या घरात पोचली आहे. 

 
जळगाव : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना नंतरही काही त्रास, व्याधींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून हा विभाग सुरू करण्यात आला असला, तरी अद्याप त्याबाबत माहिती नसल्याने रुग्णांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

वाचा- बचत गटाच्या नावाने फसवणूक; चौदा महिलांकडून गंडवले बारा लाख

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि तो भयानक पद्धतीने पसरलाही. जळगाव जिल्ह्यातही कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत कोरोना संसर्गाने उच्च पातळी गाठली. दररोज आठशे, हजारांवर रुग्ण आढळून येत असताना सद्य:स्थितीत एकूण रुग्णसंख्या ५४ हजारांच्या घरात पोचली आहे. 

अनेकांनी गमावला जीव 
साथीच्या या भीषण रोगामुळे जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी आपला जीव गमावला. सुरवातीच्या टप्प्यात ‘लाइन ऑफ ट्रीटमेंट’ ठरलेली नसल्याने व पुरेशा सुविधांअभावी दररोज दहा, पंधरा-वीस मृत्यू होत होते. आता तो आकडा बऱ्यापैकी खाली आला असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही आजअखेर एक हजार २७४ मृत्यू झाले आहेत. 

बरे झालेल्यांना त्रास सुरूच 
कोरोनातून बरे झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी तब्बल ५२ हजार रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ९७ टक्के आहे. मात्र, बरे होऊन डिस्चार्ज झालेल्यांना काही प्रमाणात त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. एवढेच नव्हे तर कोरोनातून बरे झाल्यानंतरही काहींचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. 

काय आहेत तक्रारी? 
कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना नंतरही त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात अंगावर पुरळ येणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, थकवा येणे या व्याधींचा समावेश आहे. अशा रुग्णांसाठी आता जिल्हा रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी कोरोनानंतर होत असलेल्या त्रासावर उपचार करण्यात येतात. तसेच चेस्टथेरपी, व्यायाम याबाबत रुग्णांना समुपदेशन करण्यात येते; परंतु अद्याप रुग्ण या विभागापासून अनभिज्ञ आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांना काही त्रास असेल तर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon post covid OPD started at district hospital