गृहमंत्री शहांना ‘मीराबाईं’ची जखडलेली मूर्ती राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिली भेट 

देविदास वाणी
Monday, 5 October 2020

देशात महिलांची स्थिती मूर्तीप्रमाणे झाली आहे. दोरखंडानी तिला जखडून टाकण्यात आले आहे. महिलांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात.

जळगाव ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोरखंडात जखडलेली प्रतीकात्मक संत मीराबाई यांची मूर्ती स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. सध्या देशातील महिलांची अशीच अवस्था झाली असून, त्यांचे दोरखंड सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी या वेळी केली. 

आवर्जून वाचा- मुलाची केक कापण्याची तयारी; इतक्‍यात सिलेंडरचा भडका

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेचा सोमवारी सकाळी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. युवती अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करून हाथरसच्या घटनेचा निषेध करण्यात आला.

स्पिड पोस्टने पाठवली मूर्ती

पोस्ट कार्यालयाच्या बाहेर कल्पिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्या भोसले, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ यांनी संत मीराबाई यांची दोरखंडाने जखडलेली मूर्ती आणून तिला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. देशात महिलांची स्थिती मूर्तीप्रमाणे झाली आहे. दोरखंडानी तिला जखडून टाकण्यात आले आहे. महिलांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात, यासाठीच ही प्रतीकात्मक मूर्ती पाठवीत असल्याचे कल्पिता पाटील यांनी सांगितले. 

आवश्य वाचा-  रेल्वेने दिला फुकट्या प्रवाशांना दणका ! वसुल केला ६४ हजारांचा दंड
 

तर दिल्लीपर्यंत मोर्चा आणू
हाथरस घटनेबद्दल कल्पिता पाटील यांनी संताप व्यक्त करीत यातील दोषींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा दिल्लीपर्यंत धडक मोर्चा आणण्याचा इशारादेखील पाटील यांनी या वेळी केंद्र सरकारला दिला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon protest against the Hathras incident, the nationalist youth congress gave a gift of Mirabai to Amit Shah