पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’ मानांकनाचा प्रस्ताव 

देविदास वाणी
Thursday, 7 January 2021

जळगावच्या भरताची वांगी, केळीला जीआय मानांकन मिळाले आहे. त्याचप्रमाणे वैशिष्ट्य असलेल्या अनेक बाबी जळगाव जिल्ह्यात आहेत.

जळगाव ः जिल्ह्यातील भरताची वांगी, केळीप्रमाणे पुरणपोळी (मांडे), पोथीची पाने, बिबडीचा घाटा, चमेली व मेहरुणच्या बोरांना एक विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन (जीआय मानांकन) प्रस्तावित करण्यात आले. राज्यातील भौगोलिक चिन्हांकन, मानांकनप्राप्त कृषी उत्पादनांच्या नोंदणी, प्रचार प्रसिद्धी, मूल्यसाखळी विकासित करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल व्ही. भोकरे, पणन महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक बी. बी. देशमुख, कृषी विभागातील प्रा. किरण जाधव, विषय विशेषज्ञ इंजिनिअर वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ श्रीकांत झांबरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. शिंदे, ‘आत्मा’चे उपसंचालक मधुकर चौधरी आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना आंतराष्ट्रीय बाजरपेठ मिळणार
जळगावच्या भरताची वांगी, केळीला जीआय मानांकन मिळाले आहे. त्याचप्रमाणे वैशिष्ट्य असलेल्या अनेक बाबी जळगाव जिल्ह्यात आहेत. ज्या चवीने खाल्ल्या जातात व त्यांची चर्चा होते त्यांना जिल्ह्याबाहेर देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरही बाजारपेठ मिळू शकते. केळी, भरताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळाल्याने बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना जळगावचे भरीत विकता येणार नाही. जळगावचे मांडे, खापरावरच्या पुरणपोळ्या प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातच बिबडीचा घाटा बनविला जातो. अनोरे (ता. धरणगाव) व लोणपिराचे (ता. भडगाव) गावात पोथीच्या पानांचे उत्पादन घेतले जाते. ही पोथीची पाने व गवतीचहा इतरांपेक्षा वेगळी आहे. या पिकांची पारंपरिकता, स्वाद, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोंदी घेण्याबाबाबत चर्चा जीआय मानांकन मिळल्यानंतर या खाद्यपदार्थांचा इतर कोणीही ब्रँडिंग करू शकणार नाही.

परवानगी मिळणे आवश्यक

त्यासाठी जीआय मानांकन परवानगी मिळणे आवश्यक आहे. जीआय नामांकनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रा. गणेश हिंगमिरे यांनी सादरीकरणाद्वारा सभागृहात दिली. तसेच जीआयची कार्यप्रणाली, महत्त्व, पिके, उपपदार्थांना मिळणारा अधिक फायद्याबाबत सविस्तरपणे माहिती दिली. याव्यतिरिक्त बारेस्था आंबा, श्रावण मूग, वालपापडी व बहादरपूरची गोंधडी यांना, इतर आवश्यक पारंपरिक बाबींनाही जीआय नामांकन करता येईल, याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon puranpoli bibdi meharun bor ji rating resolution finance assistant meeting