esakal | कॉनकॉर’ऐवजी ‘कंटेनर टर्मिनल’ सेवा; भुसावळ रेल्वे विभागाचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

container terminal

रेल्वेने या जागेचे भाडे वाढविल्याने ते परवडत नसल्याचे कारण देऊन ‘कॉनकॉर’ने भुसावळसह अन्य २२ ठिकाणचे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जळगाव जिल्हा व परिसरातील विविध उत्पादक, उद्योजकांपुढे माल आयात- निर्यातीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जवळपास दीड हजार कोटींची वार्षिक उलाढाल या युनिटच्या माध्यमातून होत होती,

कॉनकॉर’ऐवजी ‘कंटेनर टर्मिनल’ सेवा; भुसावळ रेल्वे विभागाचा पुढाकार

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : ‘कॉनकॉर’ने भुसावळ येथील कंटेनर युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या आयात-निर्यातीच्या समस्येवर रेल्वेनेच तोडगा काढला आहे. रेल्वेच्या भुसावळ विभागाने त्यांची कंटेनर टर्मिनल सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून, ही सुविधा जिल्ह्यासह खानदेशातील उत्पादक, उद्योगांसह ‘कॉनकॉर’साठीही उपलब्ध असेल. त्यामुळे निर्यातीतील अडथळा दूर होणार आहे. 
रेल्वेने या जागेचे भाडे वाढविल्याने ते परवडत नसल्याचे कारण देऊन ‘कॉनकॉर’ने भुसावळसह अन्य २२ ठिकाणचे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जळगाव जिल्हा व परिसरातील विविध उत्पादक, उद्योजकांपुढे माल आयात- निर्यातीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जवळपास दीड हजार कोटींची वार्षिक उलाढाल या युनिटच्या माध्यमातून होत होती, तीदेखील ठप्प होणार आहे. त्यामुळे युनिट सुरूच राहावे, म्हणून स्थानिक खासदारांनी रेल्वे व ‘कॉनकॉर’चे अधिकारी तसेच रेल्वे व वाणिज्य मंत्रालय अशा तिहेरी पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत लवकरच बैठकही होणार असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. 

रेल्वेने घेतला पुढाकार 
एकीकडे ‘कॉनकॉर’ने युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे रेल्वेने आपल्या विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करून घेत उद्योगांना त्यांच्यावतीने आयात-निर्यातीसाठीची सेवा उपलब्ध करून घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने कंटेनर रेल्वे टर्मिनल तातडीने कार्यान्वित करण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंबंधीचा प्रस्तावही रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला असून, टर्मिनल सुरू करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. 

अशी असेल सुविधा 
रेल्वे टर्मिनल ‘कॉनकॉर’च्याच धर्तीवर निर्यातदारांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे ‘कॉनकॉर’कडे नोंदणी होणाऱ्या मालाची निर्यातही महामंडळ या टर्मिनलच्या माध्यमातून करू शकणार आहे. त्यामुळे कंटेनर युनिट बंद झाल्यानंतर निर्माण झालेला निर्यातीचा प्रश्‍न बऱ्यापैकी मार्गी लागेल. जिल्ह्यातील जैन इरिगेशनसह सर्व डाळ उद्योग, पीव्हीसी पाइप व ठिबक तसेच चटई उद्योग, ऑइल इंडस्ट्रीज या प्रमुख उद्योगांना यामुळे दिलासा मिळणार आहे. 

‘कॉनकॉर’ने युनिट बंद केले असले तरी रेल्वेकडून आम्ही कंटेनर टर्मिनलची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल. त्याद्वारे मालाची आवक- जावक करता येईल. विविध उत्पादक संस्था, उद्योगांना त्याचा लाभ होईल व रेल्वेलाही उत्पन्न मिळेल. 
- विवेककुमार गुप्ता' मंडल रेल्वे प्रबंधक, भुसावळ 

संपादन : राजेश सोनवणे