esakal | कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा दिलासा; मृत्यूसत्र सुरुच 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा दिलासा; मृत्यूसत्र सुरुच 

गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. मात्र, चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचे बोलले जात होते. दिवाळीच्या पाच-सहा दिवसांत चाचण्या हजाराच्या आतच राहिल्या.

कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा दिलासा; मृत्यूसत्र सुरुच 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या वाढीचे चित्र असताना शुक्रवारी पुन्हा नव्या बाधितांचा आकडा काहीसा घसरला. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत दिलासा मिळाला. शुक्रवारी प्राप्त अहवालात नवे ३८ बाधित आढळून आले, तर ४० रुग्ण दिवसभरात बरे झाले. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून शुक्रवारी पुन्हा दोघांचा मृत्यू झाला. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग दोन महिन्यांपासून बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र, दिवाळीमुळे बाजारात झालेल्या गर्दीने पुन्हा कोरोना रुग्ण वाढतील, दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचे दिसले. मात्र, शुक्रवारी चाचण्या जास्त होऊनही केवळ ३८ रुग्णच आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५४ हजारांच्या टप्प्यात पोचली. तर दिवसभरात ४० रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५२ हजार ३३० झाला आहे. आज पुन्हा दोघा रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडाही १२८६ झाला आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १२, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ६, अमळनेर १, चोपडा ३, यावल १, एरंडोल १, जामनेर १, रावेर ६, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १. 

साडेतीन हजारांवर चाचण्या 
गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. मात्र, चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचे बोलले जात होते. दिवाळीच्या पाच-सहा दिवसांत चाचण्या हजाराच्या आतच राहिल्या. मात्र, शुक्रवारी प्राप्त अहवालांची संख्या साडेतीन हजारांवर होती. त्यापैकी केवळ ३८ रुग्ण आढळून आले, हे प्रमाण केवळ १ टक्का आहे. 

 
संपादन- भूषण श्रीखंडे