जळगावकरांना आनंदवार्ता.. बार, रेस्‍टॉरंट होणार सुरू; त्‍यासाठीचे नियम आहेत कडक

देविदास वाणी
Thursday, 1 October 2020

मुंबईतील लोकल सुरू करण्यासह राज्यांतर्गत सर्व स्थानकावरून प्रवासी घेण्यास, सोबतच रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.

जळगाव : शहरासह जिल्ह्यात येत्या ५ ऑक्टोबरपासून रेस्टांरेंट, बार सुरू करण्यासह महाराष्ट्र राज्यातंर्गत रेल्वे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज जिल्ह्यातील रेस्टांरेंट, बार सुरू करण्यास परवानगी देत, कोरोना बाबतच्या सर्व अटी नियमांचे पालन करण्याची सक्ती केली आहे. ५० टक्के क्षमतेवर दिलेल्या परवानगीत नियमाचे पालन झाल्यास कारवाईचाही इशाराही दिला आहे. शहरासह जिल्ह्यात तब्बल १९० दिवसांनंतर रेस्टांरेंट, बार सुरू होणार असल्याने रेस्टांरेंट, बार चालकांना दिलासा मिळाला आहे. 

राज्य शासनाने गेल्या दोन महिन्यापासून मिशन बिगीन अगेन सुरू केले आहे. टप्प्याने सर्व सार्वजनिक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एस.टी.ला अगोदर ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर रेल्वेला केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना परवानगी दिली होती. नंतर राज्यांतर्गत मोठ्या स्थानकावरून प्रवासी घेण्यास मान्यता दिली. आता मुंबईतील लोकल सुरू करण्यासह राज्यांतर्गत सर्व स्थानकावरून प्रवासी घेण्यास, सोबतच रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी ५ ऑक्टोबर पासून सूरू होईल. शासनाच्या सूचना येताच जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात रेस्टॉरंट, बार हॉटेल्स सुरू करण्याबाबत आदेश काढला आहे. 

९० कोटींची उलाढाल ठप्प 
शहरात ८५ तर जिल्ह्यात सुमारे एक हजारांवर रेस्टॉरंट, हॉटेल आहेत. लॉकडाउनमुळे ती सर्व बंद होती. दर महिन्यात अंदाज पंधरा कोटीची उलाढाल यामुळे बंद होती. गेल्या सहा महिन्यात ९० कोटींची उलाढाल यामुळे ठप्प झाली होती. तब्बल १९० दिवसांनंतर रेस्टॉरंट, हॉटेल सुरू होत असल्याने समाधान आहे. यामुळे अनेकांना रेाजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. 

हे सुरू राहणार 
- रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स 
- महाराष्ट्रातील सर्व स्थानकावर रेल्वे सेवा 

नियम अटी अशा 
- ५० टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट, बार, हॉटेल्सला परवानगी 
- सोशल डिस्टन्सींग आवश्‍यक 
- येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावणे आवश्‍यक 
- सॅनिटरायझेनशची सुविधा आवश्‍यक 
- क्षमतेच्या पन्नास टक्क्यांवर ग्राहक नको 

शाळा, मंदिर बंदच राहणार 
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचींग क्लासेस 
- चित्रपटगृहे, तरणतलाव, नाट्यगृहे 
- राजकीय सामाजिक सभा 
- धार्मिक स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम 

पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. २६ मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. शहरात ८० ते ८५ नोंदणीकृत रेस्टॉरंट, हॉटेल्स आहेत. यांचे मोठे नुकसान लॉकडाउनमुळे झाले आहे. 

- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष हॉटेल ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon restaurant and bar open permission