आईला भेटण्यासाठी येत असताना अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

आठवड्यातून मिळणाऱ्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी ते आईला भेटण्यासाठी जळगावी येत होते. त्‍यानुसार शिर्डीहून ते रात्री आपली ड्युटी आटोपून मध्यरात्री बाराच्या सुमारास जळगावी येण्यासाठी निघाले होते. 

जळगाव : दुचाकीने घरी परतणाऱ्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास देवकर महाविद्यालयाच्या समोर घडली. तर सोबत असलेला दुसरा पोलिस कर्मचारी जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हाबर्डी (ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ) येथील सागर रमजान तडवी (वय ३०) हे रामानंदनगर पोलिस ठाण्याला कार्यरत होते. जळगावात ते आईसोबत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची शिर्डी येथील देवस्थान येथे नेमणूक करण्यात आली होती. आठवड्यातून मिळणाऱ्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी ते आईला भेटण्यासाठी जळगावी येत होते. त्‍यानुसार शिर्डीहून ते रात्री आपली ड्युटी आटोपून मध्यरात्री बाराच्या सुमारास जळगावी येण्यासाठी निघाले होते. 

अवघ्‍या काही अंतरावर मृत्‍यूने गाठले
पोलिस कर्मचारी संतोष बोरसे यांच्यासह सागर तडवी दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव- शिरसोली रस्त्यावरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात सागर तडवी याचा जागीच मृत्यू झाला; तर सोबत असलेले पोलिस कर्मचारी संतोष बोरसे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बोरसे यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर मयत सागर तडवी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयत सागर तडवीच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon road accident in bike police death