मृत्यूची प्रतीक्षा करताय का? जळगावकर संतप्त !

सचिन जोशी
Friday, 8 January 2021

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिनी टाकल्यानंतर ते पूर्ववत केलेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी माती, मुरमाचे ढीग पडून आहेत.

 जळगाव : ‘अमृत’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामाच्या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यातच रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील सर्व प्रमुख व वस्त्यांमधील खोदलेल्या खड्ड्यांमुळे चिखल होऊन वाहने घसरण्याचे शेकडो प्रकार घडले; परंतु त्यातून धडा न घेणारे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मक्तेदार जळगावकरांच्या मृत्यूची प्रतीक्षा करताय का, असा संतप्त प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

तीन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची वाट लावणाऱ्या अमृत योजनेचे काम अद्याप अपूर्णच आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. एकीकडे हे काम होत असताना त्यामुळे खराब होणाऱ्या, खड्ड्यांत जाणाऱ्या रस्त्यांची हवी तशी डागडुजी, दुरुस्ती होत नाही. त्यामुळे दोन-तीन वर्षांपासून शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मक्तेदार म्हणून जैन इरिगेशन अथवा मलनिस्सारण योजनेचे काम हाती घेणारा मक्तेदार रस्ता दुरुस्तीबाबत बोलायला तयार नाही. महापालिका पदाधिकारी, आयुक्तही मूग गिळून आहेत. 

अवकाळी पावसाचा मार 
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिनी टाकल्यानंतर ते पूर्ववत केलेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी माती, मुरमाचे ढीग पडून आहेत. खड्डे व या ढिगाऱ्यांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांचे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच बुधवारी मध्यरात्रीनंतर शहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे या चिखलातून जाताना वाहने घसरून अनेक लहान-मोठे अपघात घडले. 

ही ठिकाणे धोकादायक 
चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका चौकात गुरुवारी सकाळपासून अनेक वाहने घसरून वाहनधारकांच्या जिवावर बेतले. महापालिका इमारतीसमोर, नवीपेठेतील काही रस्त्यांवर तसेच सामान्य रुग्णालय परिसर, जिल्हा पेठेतील बहुतांश रस्त्यांवर असे अनेक अपघात घडले. बऱ्याच जणांचे फ्रॅक्चर झाले, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon road dug waterway accident mud