जळगाव शहरात रस्ते दुरुस्तीचा सोमवार पासून 'श्री गणेशा'!

भूषण श्रीखंडे
Thursday, 19 November 2020

सुरुवातीला मुख्य, मोठे आणि त्या प्रभागातील रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

जळगाव : शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून सर्व खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढल्या असून सोमवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

खड्डे बुजविण्याचा मक्ता घेणाऱ्या मक्तेदारांची गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, भारत कोळी, धीरज सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले आणि मक्तेदार उपस्थित होते.

रहदारीच्या रस्त्यावर आधी खड्डे बुजवा

महापौरांनी सांगितले की, शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. मनपा प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. सुरुवातीला मुख्य, मोठे आणि त्या प्रभागातील रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तयार करण्याच्या कामाला देखील सुरुवात होईल असेही त्या म्हणाल्या. 

लोकप्रतिनिधी, नागरिकांनी लक्ष द्यावे
शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्येक प्रभागात सुरुवात होणार आहे. आपापल्या प्रभागात होत असलेले काम योग्य पध्दतीने होते की नाही हे त्या परिसरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वतः उभे राहून तपासावे. संबंधित मक्तेदाराकडून योग्य काम करून घ्यावे असे आवाहन महापौर सौ सोनवणे यांनी केले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon road repairs in jalgaon city will start from monday