esakal | खासगी बससाठी नियमावली; प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बससाठी नियमावली; प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण

परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या‍ निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, महाराष्ट्र मोटारवाहन नियमांतील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्‍यक आहे. 

खासगी बससाठी नियमावली; प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : ‘अनलॉक’च्या चौथ्या टप्प्यात राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध दूर केले असून, परवानाधारक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बसमध्ये प्रवास करताना एका आसनाआड एक प्रवासी, स्लीपर कोचमध्ये डबल बर्थवर एकच प्रवासी ,अशी रचना बंधनकारक असेल. शिवाय, प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण अनिवार्य असेल. 

खासगी प्रवासी बस ऑपरेटरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने, तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या‍ निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, महाराष्ट्र मोटारवाहन नियमांतील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्‍यक आहे. 

अशी आहे नियमावली 
- प्रत्येक फेरीअंति बसचे निर्जंतुकीकरण 
- बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांची स्वच्छता 
- कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा 
- प्रवाशांनाही मास्क अनिवार्य 
- बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर असावे 
- बसमध्ये प्रवाशांसाठी अतिरिक्त मास्क ठेवावे 
- प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी आवश्‍यक 
- प्राथमिक लक्षणे असल्यास प्रवास नको 

अशी असेल आसनव्यवस्था 
- प्रवासी एकाआड एक पद्धतीने आसनस्थ होतील 
- स्लीपर बसमध्ये ‘डबल बर्थ’वर एकच प्रवासी 
- बस थांबविताना संबंधित ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी 
- प्रवासी शारीरिक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे