चोरीच्या वाळूला सोन्याचा ‘दर’ !

देविदास वाणी
Tuesday, 24 November 2020

नदीपात्रात वाहनांना उतरण्यास बंदी असताना मध्यरात्रीच्या सुमारास वाळू माफियांची जत्राच नदीपात्रात भरत असल्याचे चित्र आहे.

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात तब्बल वर्षभरापासून वाळूचे लिलाव झालेले नाहीत. असे असताना वाळूची सर्रास विक्री होताना दिसते. चार ते पाच हजाराला मिळणारी वाळू तब्बल चौदा हजार रुपये डंपर या दरानुसार मिळत आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माफिया वाळूची अवैधरीत्या उपसा करतात अन्‌ विकतातही. वाळू माफियांशी पंगा घेण्यास कोणी धजत नसल्याने वाळू माफियांचे फावले आहे. गिरणा नदीपात्रात वाहने नेण्यास बंदी असताना, नदीपात्रात उतरून वाहने मध्यरात्री वाळू भरून बाहेर पडतात अन् योग्य ठिकाणी खाली करून परततातही. 

आवश्य वाचा- विहिरीतून आला उग्र वास; पाहिले तर दिसला तरंगणारा मृतदेह

जिल्ह्यात गिरणेच्या वाळूला मोठी मागणी आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने नदीत प्रचंड प्रमाणात वाळू आहे. तब्बल तीन ते चार महिन्यांपासून वाळू लिलावाच्या प्रक्रियेसाठी वाळू गटांचे सर्वेक्षण करून राज्यस्तरीय पर्यावरण समितीला पाठविले आहे. मात्र अद्यापही वाळू गटांच्या लिलावांना परवानगी मिळालेली नाही. 

अवैध उपसा सुरू 
दुसरीकडे वाळूचोरी सर्रास सुरू आहे. नदीपात्रात वाहनांना उतरण्यास बंदी असताना मध्यरात्रीच्या सुमारास वाळू माफियांची जत्राच नदीपात्रात भरत असल्याचे चित्र आहे. रात्रीच वाळू उपसून ती संबंधितांच्या घरी पोचविली जाते. आरटीओ, महसूल अधिकारी, पोलिस कोणीही अवैध वाळू रोखायला, वाहने अडवायला मध्यरात्रीनंतर रस्त्यावर नसतात. हीच संधी साधत वाळू माफिया रेती सोन्याच्या दरात विकून मोकळे होतात. 

बांधकामे सुरूच 
जर जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे तर बांधकामांना वाळू मिळते कोठून. याचा शोध महसूल विभागाने कधी घेतला नाही. मध्यरात्रीनंतर पहाटे सहापर्यंत काहीही करा, मात्र दिवसा वाळूची चोरी करू नका, असा अघोषित फतवा यंत्रणेने काढलेला दिसून येतो. यामुळे बांधकामांच्या ठिकाणी वाळू रातोरात पोचविली जाते. 

वाचा- सक्रिय रुग्णांचा गंभीर रुग्णही वाढले

वाघनगर, शामनगरात साठा 
गिरणा पंपिंग रस्त्यावरील वाघनगर, शामनगर परिसरात अनेक ठिकाणी वाळूचे ढीग केलेले दिसत आहेत. महसूल विभाग, पोलिस, आर. टी. ओ. अशा ठिकाणी जाऊन वाळू जप्त का करीत नाहीत? किमान पंचनाम्याची तसदी या साठ्यांबाबत महसूल विभागाने घेतलेली नाही. 
 
पाच हजारांचा डंपर १४ हजारांत 
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. ज्यांना वाळू हवी त्यांना पाच हजारांत मिळणारे गिरणा नदीतील वाळूचे डंपर १४ हजारांत मिळते आहे. भुसावळ परिसरात वाघूर नदीची वाळू साडेसात हजारांत डंपर भरून मिळते आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sale of stolen sand is rampant even though the auction is delayed