esakal | जळगाव जिल्हात कोरोनाची दुसरी लाट २५ तारखेनंतर ? 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्हात कोरोनाची दुसरी लाट २५ तारखेनंतर ? 

राज्यस्तरीय आरोग्य यंत्रणेच्या शक्यतेनुसार दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, चौदा हजार पाचशे बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

जळगाव जिल्हात कोरोनाची दुसरी लाट २५ तारखेनंतर ? 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : दिवाळीत अनेक जण आपापल्या घरी परत, काही जण परदेश, परराज्यातून आले व तिकडे गेले. याद्वारे कोरोना संसर्गाची लाट शक्यतो २५ नोव्हेंबरनंतर येऊ शकते. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीनंतर आता मंदिर, इतर प्रार्थनास्थळेही सुरू झाली आहे. जे-जे लॉकडाउन केले होते, ते सर्व अनलॉक करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण सलग महिनाभर सापडणार नाही, तोपर्यंत संपूर्णपणे कोरोना गेला असे म्हणता येणार नाही. यामुळे कोरोना रुग्णवाढीची भीती अद्यापही कायम आहे. 

राज्यस्तरीय आरोग्य यंत्रणेच्या शक्यतेनुसार दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, चौदा हजार पाचशे बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाची लागण झाली. 

 ॲक्टिव्ह रुग्ण चारशेच्या आत 
जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक आरोग्य सुविधा देत ५१ हजार ८१० जणांना या व्याधीपासून बरे केले. मात्र उशिराने दाखल झालेल्या किंवा अगोदरच व्याधी असलेल्या त्यात कोरोना झालेल्या एक हजार २७८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३९४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे दररोज दोन ते अडीच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात अतिशय कमी संख्येने बाधित आढळत आहेत. 


दुसरी लाट शक्य 
दुसरीकडे मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवाळीनंतर अनेक नागरिक परजिल्हा, राज्यातून जळगाव जिल्ह्यात येतील किंवा येथील बाहेर जातील. यात कोरोना संक्रमणाची दाट शक्यता आहे. त्याचा प्रभाव दिवाळी संपल्यानंतर सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डेडिकेटड कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्वच ठिकाणी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, पीपीई किट, इतर सुविधांची तयारी करण्यात आली आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर एकावेळी १४ हजार रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. 

...अशी आहे सज्जता 
बेड्स उपलब्ध : १४ हजार 
ऑक्सिजन बेड : २ हजार 
आयसीयू बेड : ५०० 
व्हेंटिलेटर : ३४० 


दिवाळीत अनेक जण नातेवाइकांकडे गेले असतील. त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह आल्यास लागलीच दाखल होऊन उपचार घ्यावेत. बाहेर पडताना नाका-तोंडाला मास्क लावावा, सॅनिटाझयरचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक