विधवा वहिनीसोबत विवाह अन्‌ साली सोबत पहा काय केले...; घाणेगावच्या उमेश शेळकेची अनोखी कहाणी 

marriage
marriage

पाचोरा : अलीकडच्या काळात प्रेमासंदर्भात अनोखे किस्से पाहायला मिळत असले तरी अनेकदा आदर्श प्रेमाचा शेवट किती भयावह होऊ शकतो, याची कल्पनाही करवत नाही. ‘सैराट’ चित्रपटातील प्रेम कहाणीचा शेवट जसा सर्वांनाच हेलावणारा आहे, तशा स्वरूपाचे किस्से समाजात वाढत असल्याचे आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार घाणेगाव (ता. सोयगाव) येथील उमेश शेळके नामक युवकाच्या संदर्भात अनुभवायला मिळाला आहे. भावाच्या निधनानंतर दोन मुलांसह विधवा वहिनीशी विवाह करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवणाऱ्या उमेशचे सालीसोबत प्रेमाचे संबंध निर्माण झाले व तिच्याशी विवाह करणे शक्य होणार नसल्याने तिच्यासोबत आपली जीवनयात्रा त्याने संपवली. एखाद्या या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी उमेशची अनोखी कहाणी आहे. 
घाणेगाव (ता. सोयगाव) येथील रहिवासी असलेला उमेश शेळके (वय ३५) हा उत्कृष्ट मेकॅनिक. अनेक वर्ष त्याने पुणे येथे चांगल्या पगारावर नोकरी केली. दरम्यानच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाल्याने उमेश कमालीचा खचला. या दुःखातून तो सावरू शकला नाही. त्याच्या मयत भावाला मुलगा व मुलगी आहे. भावाची आठवण दीर्घकाळ कायम राहावी व भावाची अपत्ये आपल्याच कुटुंबात रहावीत या उदात्त हेतूने उमेशने भावाच्या दोघा मुलांसह विधवा वहिनीशी दोन वर्षापूर्वी विवाह करून त्यांना आधार दिला. तो घाणेगाव येथेच मिळेल ते शेतीचे काम करून आपला चरितार्थ चालवत होता. 
लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने कैलास शेळके या काकांनी त्याचा सांभाळ केला व संसारही सावरला. समाजापुढे वेगळा आदर्श ठेवणाऱ्या उमेशचे त्याची विवाहित असलेली साली (पत्नीची लहान बहीण) पिंकी हिच्याशी प्रेमसंबंध कधी जुळले हे त्यालाही कळले नसेल. पिंकीचा विवाह झाला असून तिलाही एक मुलगा आहे. धानोरा (ता. नांदुरा) हे तिचे माहेर असून गहूलखेडा (ता. मलकापूर) हे पिंकीचे सासर आहे. उमेश व पिंकी या दोघांमधील प्रेमसंबंध दिवसागणिक फुलत गेले. मात्र, दोन्ही कुटुंबीयांना त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. दोघी बहिणी आपापल्या संसारात रमलेल्या असताना दोघांच्या संसाराला जणू दृष्ट लागली ती प्रेमाची. उमेशचे आपली साली पिंकीसोबत प्रेमसंबंध वाढत गेले. मात्र, आपण दोघे विवाह करून एकत्रित येऊ शकणार नाहीत याची त्यांना जाणीव असल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला. 

विवाह करून आत्महत्या 
तीन दिवसांपूर्वी मयत पिंकीच्या लहान बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम धानोरा येथे होता. त्यासाठी उमेशची पत्नीही धानोरा येथे गेली होती. साखरपुडा आटोपून दोन्ही बहिणी घाणेगावात दोन दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. पिंकीला ‘मी तिच्या सासरी गहूलखेडा येथे सोडतो’ असे सांगून उमेश मंगळवारी (१६ जून) सकाळी घाणेगाव येथून निघाला. दोघांना एकत्र येण्याची चांगली संधी मिळाली. ते दोघे पाचोऱ्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारची रात्र कुठे काढली हे त्यालाच ठाऊक. बुधवारी (१७ जून) सकाळी उमेश व पिंकी यांना गोराडखेडा शिवारातील पीजे रेल्वे मार्गालगत काहींनी बघितले. दुपारी एकच्या सुमारास दोघांचे मृतदेह या परिसरात आढळले. दोघांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा होत्या. या परिसरातील एखाद्या मंदिरात त्यांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकून विवाह केल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. विवाह करून दोघांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतदेहाजवळ डायरी, पेन, कीटकनाशकाची बाटली, दोन प्लॅस्टिकचे ग्लास व मयत पिंकीची पर्स मिळून आली. डायरीत काय गोष्टी नमूद आहेत? हे यथावकाश स्पष्ट होईल. परंतु विधवा बहिणीशी विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवणारा उमेश सालीशी झालेल्या प्रेमामुळे आपली जीवन यात्रा संपवून आपल्याच आदर्शत्वाला त्याने काळीमा फासला. दोघांनी आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच मयत उमेशचे काका कैलास शेळके व त्यांचे पाचोरा येथील नातलगांनी पाचोरा पोलिस ठाणे 
गाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com