esakal | बिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse gulabrao patil

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे नाटक करून बंडखोरीला खतपाणी घातले. या माध्यमातून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये हाच फॉर्म्युला वापरून भाजप नितीशकुमारांना संपविण्याचा प्रयत्न करत आहे.

बिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेबाबत आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू, म्हणून विरोधक टीका करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो, तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुखांनीदेखील आम्हाला हेच सांगितले होते. शिवाय, बिहार निवडणूकीत भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मांडणार असल्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील यांनी शुक्रवारी (ता. ९) अजिंठा विश्रामगृहात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. खडसे अगोदर शिवसेनेत येणार होते. आता त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे नाटक करून बंडखोरीला खतपाणी घातले. या माध्यमातून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये हाच फॉर्म्युला वापरून भाजप नितीशकुमारांना संपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारात आम्ही भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार आहोत. 
 
खानदेशचा मान 
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ‘स्टार प्रचारक’ म्हणून संधी दिली आहे. हा जळगाव आणि खानदेशचा सन्मान आहे, असे मी मानतो. योगायोगाने आपल्या आणि त्यांच्या प्रदेशातील भाषेचा वेगळा-वेगळा प्रभाव असणार आहे. मी निश्‍चितच पक्षासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
 
खडसे कुठेही गेले तरी आनंदच
भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ते ३० वर्षे आमदार राहिले असून, मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंदच आहे. खडसे भाजपतून गेले, हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा असल्‍याचे पालकमंत्री पाटील यांनी येथे केले.