बोगस बियाण्यांच्या तक्रारी पाठवा, गुन्हे दाखल करू 

कैलास शिंदे
Monday, 3 August 2020

जिल्ह्यात दोन हजार 233 कृषी केंद्रे आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. या बियाण्यांचा कृषी विभागाने सर्व्हे केला असता, कापूस व सोयाबीनचे तब्बल 37 प्रकारचे बियाणे बोगस आढळले.

जळगाव : बियाणे लावले आणि ते उगवले नसेल, तर बोगस बियाण्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी पाठवाव्यात. आम्ही संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करू, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

जळगाव जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची मोठी लागवड होते. या पिकांचे 37 प्रकारचे बियाणे बोगस असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मितावली (ता. चोपडा) येथे सोयाबीनची मोठी लागवड शेतकऱ्यांनी केली. मात्र, बियाणे उगवले नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेण्यात न आल्याची माहिती देवेंद्र मराठे यांनी दिली. ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात दोन हजार 233 कृषी केंद्रे आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. या बियाण्यांचा कृषी विभागाने सर्व्हे केला असता, कापूस व सोयाबीनचे तब्बल 37 प्रकारचे बियाणे बोगस आढळले. ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी जाऊन 242 नमुने घेतले. त्यांपैकी केवळ 30 ते 40 नमुन्यांचा अहवाल त्यांनी जाहीर केला आहे. उर्वरित अहवाल त्यांनी दिलाच नाही. ज्या कंपन्यांचे बियाणे बोगस आढळले, अशा कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. त्यांना बाजारात बंदीही घातली नाही. त्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांशी खेळ करीत आहे. 

याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. या बियाणे कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही आपण केल्याचे मराठे यांनी सांगितले. त्यावर कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले, की ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, त्यांनी केवळ कृषी विभागाकडे तक्रार द्यावयाची आहे. संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई कृषी विभाग करेल. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Send complaints of bogus seeds, let's file a crime