वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन्‌ पवार ! 

वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन्‌ पवार ! 

जळगाव ः शरद पवारांसारखी व्यक्ती केवळ राजकीय वर्चस्वातून मोठी होत नसते.. तर, त्या व्यक्तीत असलेल्या अन्य गुणांमुळे तिला नेत्याची सर्वमान्यता मिळते.. ज्येष्ठ असूनही पवारांमधील पंक्चुॲलिटी अर्थात वेळेचा काटेकोरपणा आणि प्रोटोकॉलचा म्हणजे राजशिष्टाचाराचा सन्मान या दोन्ही बाबी राजकारण्यात करिअर करणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरु शकतील.. अर्थात, त्यांनी त्या पाळल्या तरच! 

आवश्य वाचा- राम राम तात्‍या..लक्ष असू द्या बरं; गावात ऐकू येणार बोल, ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात पाच दशकांहून अधिक काळ वर्चस्व गाजविणारे व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील नेता म्हणूनच नव्हे तर देशातील राजकारणावरही प्रभाव पाडणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींत पवारांचा उल्लेख आदराने केला जातो. पण, पवारांसारखी व्यक्ती केवळ राजकारणात इतकी वर्षे आहे म्हणून आदरणीय होत नाही. तर त्या व्यक्तीत नेतृत्वगुणाव्यतिरिक्त असलेले अन्य पूरक गुणांमुळे अशा व्यक्तींना समाज सर्वार्थाने स्वीकारतो. म्हणूनच पवारांच्या एकूणच स्वभावगुणांचे अवलोकन करताना काही लगेच लक्षात येणाऱ्या बाबींचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.. कारण, त्यांच्यातील हे गुण वेळोवेळी त्यांच्या कृतीतून प्रकटही होत असतात. त्यापैकी लक्षात येणारा त्यांच्यातील गुण म्हणजे त्यांची पंक्चुॲलिटी अर्थात वेळ पाळण्याची शिस्त अन्‌ प्रोटोकॉलचा सन्मान करणे.. 

जळगाव, जैन समूहाशी ऋणानुबंध 
या दोन्ही गुणांच्या संदर्भात जळगावात अनुभवास आलेल्या एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जळगावात पवारांचे राजकीयदृष्ट्या जसे ऋणानुबंध आहेत, तसे कौटुंबिक आणि मित्रत्वाचे नातेही त्यांनी अनेकांशी जपले आहे. त्यामुळेच की काय, जैन उद्योग समूहाचा एकही मोठा कार्यक्रम पवार ‘मिस’ करीत नाही, किंबहुना तो कार्यक्रम पवारांशिवाय पूर्णही होऊ शकत नाही. जैन इरिगेशनतर्फे दिले जाणारे कृषिक्षेत्रातील द्विवार्षिक पुरस्कार असो, डाळींब परिषद असो की.. आणखी काही मोठे सोहळे. या कार्यक्रमांना भवरलालजींच्या प्रेमापोटी पवार हजर राहणारच.. त्यांचं या समूहाशी नातं एवढं घट्ट की, भवरलालजी आज हयात नसतानाही पवार जैन समूहाच्या पाठिशी अगदी भक्कमपणे पालकाच्या भूमिकेतून उभे आहेत. 

त्यावेळचा प्रसंग.. 
त्याच जैन इरिगेशनच्या जानेवारी २०१६मधील सोहळ्यातील हा प्रसंग. त्या एकाच दिवशी दोन मोठे कार्यक्रम होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खानदेश सेंट्रलला गिरीश महाजनांच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिर आणि दुपारी जैन हिल्सवरील सोहळा. आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून फडणवीस जैन हिल्सवर जाणार होते. हिल्सवरील कार्यक्रम दुपारी २ वाजेचा. पवार नेहमीप्रमाणे अगदी वेळेत २ वाजता हिल्सवरील कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर विराजमान होतात.. अगदी एकटेच, अन्य कुणीही प्रमुख अतिथी त्यावेळी व्यासपीठावर नव्हते. पवार आणि त्यांचे जवळचे स्नेही कवीवर्य ना.धों. महानोर या दोघांचीच उपस्थिती. तब्बल तासभर प्रतीक्षा केल्यानंतर फडणवीस हिल्सवरील त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले.. वयाने ज्येष्ठ, पण मुख्यमंत्री आल्यानंतरचा प्रोटोकॉल पवार साहेब अजिबात विसरले नाही.. फडणवीसांनी व्यासपीठावर येताच पवार खुर्चीतून उठून उभे राहिले अन्‌ त्यांनी स्वत: फडणवीसांचे हात जोडून स्वागतही केले.. फडणवीसांनी ज्येष्ठ नेते म्हणून पवारांना बसण्याची विनंती केली, पण मुख्यमंत्री बसल्यानंतरच पवारही खुर्चीत बसले... अख्खे सभागृह हा प्रसंग अन्‌ त्यातून साकारणारा पवारांचा उदारपणा अनुभवत होते... टाळ्यांचा गजर करत..! 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com